ना लसीकरण, ना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग; तिसरी लाट कशी रोखणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:57 AM2021-05-12T10:57:56+5:302021-05-12T10:58:01+5:30
Washim News : ग्रामीण भागात संभाव्य तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणाची गती मंदावली असल्याने आणि वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याने ग्रामीण भागात संभाव्य तिसरी लाट कशी रोखणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च, एप्रिल महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. एप्रिल महिन्यापासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. चाचण्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या स्थिर असल्याचे दिसून येते. मात्र, त्याचबरोबर ग्रामीण भागात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नसल्याचेही समोर येत आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील किमान १५ जणांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश आहेत. त्या तुलनेत कमी प्रमाणात चाचण्या होत असल्याचे दिसून येते.
कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यात येत आहे. तथापि, गत एका महिन्यापासून मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीमही प्रभावित होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तालुकास्तरीय कोविड केअर सेंटरमध्येदेखील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध नाही. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व लसीकरणाला गती देणेही आवश्यक ठरत आहे.
उपलब्ध लसीनुसार ग्रामीण व शहरी भागात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना चाचण्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिलेल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा परिश्रम घेत आहे. नागरिकांनीदेखील सहकार्य करून योग्य ती दक्षता घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.