ध्वनिप्रदूषण करणे महागात पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:44 AM2021-09-18T04:44:55+5:302021-09-18T04:44:55+5:30

वाशिम : जिल्ह्यात गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर विशेष ‘वाॅच’ ठेवला जात आहे. त्यानुषंगाने प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी १६ ध्वनी प्रदूषण ...

Noise pollution will be expensive | ध्वनिप्रदूषण करणे महागात पडणार

ध्वनिप्रदूषण करणे महागात पडणार

Next

वाशिम : जिल्ह्यात गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर विशेष ‘वाॅच’ ठेवला जात आहे. त्यानुषंगाने प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी १६ ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यासह जिल्हास्तरावर संनियंत्रण समितीचे गठण करण्यात आले. कोणत्याही ठिकाणी ध्वनी प्रदूषण होत असल्यास याबाबतची माहिती संबंधित प्रदूषण नियंत्रण प्राधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी केले आहे.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकारी म्हणून वाशिमचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, शहर पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर, ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झळके, रिसोडचे पोलीस निरीक्षक नवलकर, मालेगावचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ, शिरपूर पोलीस निरीक्षक सुनील वानखडे, मंगरूळपीर पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे, अनसिंगच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नैना पोहेकर, आसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील तायडे, जऊळकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आजिनाथ मोरे, कारंजाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल ठाकरे, कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, कारंजा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गजानन धंदर, मानोराचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव या पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यासह जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीचे अध्यक्ष अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण हे असून गृह शाखेचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक डी.सी. खंडेराव हे सदस्य व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हे सचिव आहेत. ध्वनिप्रदूषण तक्रारीकरिता नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाचा क्रमांक ११२ वरही संपर्क साधू शकतात, असे पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कळविले आहे.

...........................

बाॅक्स :

विशिष्ट वाहनांवर विशेष लक्ष

महागड्या वाहनांना कर्णकर्कश हाॅर्न बसवून त्याचा गर्दीच्या ठिकाणी वापर केला जातो. अशा विशिष्ट वाहनांवर ध्वनिप्रदूषण नियंत्रण प्राधिकाऱ्यांचे विशेष लक्ष राहणार आहे. विशेषत: दवाखान्यांच्या परिसरात आवश्यकता नसताना हाॅर्न वाजविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

...............

कोट :

शाळा-महाविद्यालये, कोचंग क्लासेस, दवाखान्यांचा परिसर यासह मुख्य बाजारपेठेत वाहनांवरील कर्णकर्कश हाॅर्न वाजविणाऱ्यांची गय केली जाणार आहे. ध्वनिप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी जिल्हाभरात नियंत्रण प्राधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम

Web Title: Noise pollution will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.