‘नॉन-कोविड’ रुग्णांना मिळणार घरपोच उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 11:05 AM2020-06-08T11:05:08+5:302020-06-08T11:05:41+5:30
रुग्णांवर वेळेवर उपचार मिळावे याकरीता त्यामुळे आरोग्य विभागाने अॅक्शन प्लॅन आखला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पावसाळ्यात ग्र्रामीण भागात साथरोग उद्भवल्यास तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये वैद्यकीय पथके स्थापन करून ‘नॉन-कोविड’ रुग्णांना घरोघरी जावून उपचार व औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी ३ जून रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या आढावा सभेत केल्या होत्या. या सुचनेची अंमलबजावणी भोयणी, दादगाव येथून ५ जूनपासून सुरू झाली असून, यापुढेही अधिक दक्षता घेतली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
आगामी पावसाळ्याच्या काळात कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराचे रुग्णसुद्धा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा रुग्णांवर वेळेवर उपचार मिळावे याकरीता त्यामुळे आरोग्य विभागाने अॅक्शन प्लॅन आखला आहे. ग्रामीण भागात व प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये वैद्यकीय पथके स्थापन करून ‘नॉन-कोविड’ रुग्णांना घरोघरी जावून उपचार व औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विशेषत: वृद्ध रुग्णांवर विशेष वॉच राहणार असून, वयोवृद्ध नागरिकांनीदेखील विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
साथरोग निर्माण झाल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा, या पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार आढावा घेऊन आवश्यक तो औषधी साठा आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध केला जाणार आहे.
दरम्यान, महानगर, परजिल्हा तसेच परराज्यातून येणाऱ्या मजूर, कामगारांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य केद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणी केली जात आहे. आतपर्यंत ७१ हजार मजूर, कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांची तपासणी फिव्हर क्लिनिक येथेच केली जात आहे. नागरिकांनीदेखील दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
ताप, सर्दी, खोकला असणाºया रुग्णांची तपासणी मोहिम
जिल्ह्यातील ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया व्यक्तींची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ह्रदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अधिक असल्याने अशा व्यक्तींची सुद्धा विशेष काळजी घेतली जाणार आहे.
परराज्य, परजिल्ह्यातून परतलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यापुढे अधिक दक्षता बाळगत प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया तसेच अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांवर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाचा विशेष वॉच असणार आहे.
संकेतस्थळावर नोंदणी करण्याची सुविधा
कोेरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया व्यक्तींची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ह्रदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अधिक असतो. आशा व्यक्तींची सुद्धा विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे असे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, तसेच ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाºया व्यक्तींसाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या संकेतस्थळावर संबंधित रुग्णांना आपली अचूक, संपूर्ण माहिती नोंदवावी लागणार आहे.
माहिती दिशाभूल करणारी असल्यास फौजदारी कारवाई
संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या माहितीची खातरजमा करून आवश्यकता असल्यास संबंधितांची आरोग्य तपासणी व उपचाराविषयी निर्णय घेण्यात येईल. दुसरीकडे भरलेली माहिती दिशाभूल करण्यासाठी देण्यात आल्याचे आढळल्यास फौजदारी कारवाईदेखील केली जाईल. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताप, सर्दी, खोकला यापैकी कोणतेही लक्षण असल्यास स्वत:हून संकेतस्थळावर अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.