कारवाईचा धाक नाही; वाशिम जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा सुरुच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:50 PM2017-12-19T15:50:07+5:302017-12-19T15:53:33+5:30
वाशिम: कारवाईला न जुमानता अद्यापही काही ठिकाणी वाळूचा अवैध उपसा सुरूच असल्याचे लोकमतकडून मंगळवारी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले.
वाशिम: जिल्ह्यात एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नसताना विविध ठिकाणच्या नदीपात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा करण्यात येत आहे. या संदर्भात मानोरा तालुक्यासह इतर काही ठिकाणी महसूल प्रशासनाकडून वाळू चोरट्यांवर कारवाई करून दंडही वसुल केला आहे; परंतु त्या कारवाईला न जुमानता अद्यापही काही ठिकाणी वाळूचा अवैध उपसा सुरूच असल्याचे लोकमतकडून मंगळवारी करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले.
वारंवार होणाºया वाळू उपशामुळे नदीपात्राचे नुकसान होऊन त्याचा परिणाम जलचरांच्या अस्तित्वावर होतो, तसेच या उपशामुळे संबंधित नदीच्या परिसरातील पर्यावरणावरही त्याचे दुष्परिणाम होतात, तसेच अवैध वाळू उपशामुळे मोठ्या प्रमाणात महसुलही बुडतो. असे असताना आणि वाशिम जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसतानाही काही ठिकाणी प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फे कून वाळू उपसा करण्यात येत असल्याचे दिसते. यातील वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी लोकमतच्यावतीने मंगळवारी काही ठिकाणी स्टिंग आॅपरेशन राबविण्यात आले. यावेळी काही ठिकाणी नदीपात्रातून अवैध उपसा बिनदिक्कत करण्यात येत असल्याचे आढळून आले. वाळू उपशासाठी पद्धतशीरपणे खोदकाम करून खोदलेली वाळू नदीपात्राच गाळून घेण्यासाठी चाळणीचा वापरही करण्यात येत असल्याचेही दिसून आले. दरम्यान, जिल्ह्यात वाळू घाटांचा लिलाव झाला नसताना काही ठिकाणी अवैध वाळू उपसा करण्यात येत असल्याच्या तक्रारी महसूल प्रशासनाकडे करण्यात आल्यानंतर प्रशासनाने काही ठिकाणी पाहणी केली. या अंतर्गत मानोरा तालुक्यात होत असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करून दंडही आकारण्यात आला; परंतु त्या कारवाईचा फारसा परिणाम झाला नसल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनवरून स्पष्ट झाले आहे.