लसीचा पुरेसा साठा नाही; १ मेपासून लसीकरण कसे होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:44 AM2021-04-28T04:44:47+5:302021-04-28T04:44:47+5:30
वाशिम : कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. या गटातील लाभार्थींची संख्या मोठी ...
वाशिम : कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. या गटातील लाभार्थींची संख्या मोठी असल्याने त्या तुलनेत लसीची मागणीही वाढणार आहे. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यात लसीचा पुरेसा साठा नसल्याने १ मेपासून १८ वर्षांवरील लाभार्थींच्या लसीकरणाचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना लसीकरणाचा मोठा आधार आहे. मागील चार महिन्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. लसीकरणाला लाभार्थींचा प्रतिसादही मिळत आहे. परंतु, गरजेनुसार लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहीम प्रभावित होत आहे. जिल्ह्यात १३७ केंद्रांमध्ये लसीकरण करण्यात येत आहे. आठवडाभर यशस्वी चाललेल्या लसीकरणानंतर लसीचा तुटवडा भासल्याने लसीकरण माेहीमही अधूनमधून प्रभावित होते. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींची अंदाजे संख्या ४ लाख १५ हजार ३४ असून, २६ एप्रिलपर्यंत यापैकी १ लाख २७ हजार ३६४ व्यक्तिंना म्हणजेच ३०.६८ टक्के व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर १० हजार ५२८ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लसीचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध नसला तरी लवकरच साठा प्राप्त होणार असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले.
०००००००००००००
मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोविड लस देण्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले. ही मोहीम कशा पद्धतीने राबविण्यात येणार आहे, याविषयी जिल्हा आरोग्य विभागाला शासनामार्फत आवश्यक मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.
जोपर्यंत मार्गदर्शक सूचना मिळत नाहीत, तोपर्यंत जिल्हास्तरावर या लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन करणे शक्य नसल्याचे जिल्हा आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर १८ वर्षांवरील लसीकरण मोहिमेची दिशा स्पष्ट होणार आहे.
00
जिल्ह्यात १३७ केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. दैनंदिन सरासरी तीन ते साडेतीन हजार नागरिकांना लस देण्यात येते. सर्वच केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून, एक ते दोन दिवसात लसीचा आणखी साठा उपलब्ध होणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येईल.
- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
०००००
आतापर्यंत
३० टक्के टार्गेट पूर्ण
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करून त्यांना कोरोना संसर्गापासून संरक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासन विशेष प्रयत्न करीत आहे.
जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींची अंदाजे संख्या ४ लाख १५ हजार ३४ असून, २६ एप्रिलपर्यंत यापैकी १ लाख २७ हजार ३६४ व्यक्तिंना म्हणजेच ३०.६८ टक्के व्यक्तींनी लसीचा डोस घेतला आहे.
१ मेपासून कोविड लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढणार आहे. त्या तुलनेत लसीचा पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, लस उपलब्ध न झाल्यास आरोग्य विभागासमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
00
सध्या सुरू असलेली केंद्र १३०
एकूण केंद्र १३०
.....
जणांना दररोज लस देण्याचे टार्गेट ३०००
जणांना प्रत्यक्षात लस दिली जाते ३५००
००००