महानगरातून आलेल्या नागरिकांना बजावल्या नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:48 PM2020-04-03T12:48:08+5:302020-04-03T12:48:14+5:30
महानगरातून आलेल्या नागरिकांना बाहेर न निघता घरातच राहण्यासंदर्भात स्थानिक ग्राम समितीच्यावतीने २ एप्रिल रोजी नोटीस देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंगळा : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरातून आलेल्या नागरिकांना बाहेर न निघता घरातच राहण्यासंदर्भात स्थानिक ग्राम समितीच्यावतीने २ एप्रिल रोजी नोटीस देण्यात आल्या. घरात न राहिल्यास कलम १४४ नुसार संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.
जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव विदेशात, परराज्यात, महानगरात गेलेले नागरिक गत १५ दिवसांत जिल्ह्यात परतले आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून या नागरिकांची माहिती संकलन करणे, आरोग्य तपासणी करणे आणि १४ दिवस घरातच राहणे याबाबत स्थानिक ग्राम समितीच्यावतीने कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यात प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे, नाशिक आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. ते आता परत येत असून, त्यांची आरोग्य तपासणी केली जात आहे. महानगरातून मुंगळा परिसरात जवळपास ३० ते ४० नागरिक परत आले असून, सावधगिरीचा उपाय म्हणून या सर्वांच्या घरी जाऊन ग्राम समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. पुढील १४ दिवस घरातच राहावे, कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडू नये अन्यथा नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल असा इशारा ग्रामसमिती व ग्रामपंचायतने दिला. यावेळी सरपंच सिंधुबाई पवार, उपसरपंच गजानन केळे, पोलीस पाटील केशव गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी भीमराव वानखडे, विठ्ठल केळे, किशोर ठाकरे, गाव कामगार ओम राऊत आदींची उपस्थिती होती.