आता प्लास्टिकचा वापर करणाऱ्या लाॅन, मंगल कार्यालयांवर कारवाई
By नंदकिशोर नारे | Published: March 23, 2024 03:46 PM2024-03-23T15:46:54+5:302024-03-23T15:47:08+5:30
वाशिम : शासन निर्देशानुसार सर्वत्र एकल वापराच्या प्लास्टिकवर , पिशव्यांसह ईतर वस्तुंचा वापर व विक्रीवर बंदी लादण्यात आली आहे. ...
वाशिम : शासन निर्देशानुसार सर्वत्र एकल वापराच्या प्लास्टिकवर , पिशव्यांसह ईतर वस्तुंचा वापर व विक्रीवर बंदी लादण्यात आली आहे. तरीही काही जण याचा वापर करणारे दिसून येत असल्याने नियम ताेडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरातील अनेक व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी निर्णयाचे स्वागत करुन प्लास्टिक विक्री बंद केली, परंतु काही जण अजुनही वापर करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून आता लग्न समारंभासह इ्तर कार्यक्रमासाठी लाॅन, मंगल कार्यालयामध्ये प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. अपूर्वा बासूर (भाप्रसे) यांनी घेतला आहे.
वाशिम नगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक वापरणाऱ्यांवर धाडसत्र राबवून गत काही दिवसांमध्ये ७ दुकानांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ५५ हजार रुपये दंड व १७० किलाे प्लास्टिक जमा केले आहे. यामुळे अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.
प्लास्टिक अग्निमशमन विभागात जमा करण्याच्या सूचना
शहरातील व्यापाऱ्यांकडे, नागरिकांकडे जर एकल वापराचे प्लास्टिक असेल तर त्यांनी ते वाशिम नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात जमा करण्याच्या सूचना संबधितांना देण्यात आल्या आहेत. यानंतर कारवाई दरम्यान एकल वापराचे प्लास्टिक आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
प्लास्टिकमुळे उदभवणारे आजार पाहता नागरिकांनी ते वापरु नये. याबाबत जनजागृती केली जात आहे. जे या नियमांची पायमल्ली करणार त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्या जाणार आहे. या उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे.
डाॅ. अपूर्वा बासूर, (भाप्रसे) मुख्याधिकारी, नगर परिषद वाशिम