वाशिममध्येही आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 06:14 PM2019-09-02T18:14:05+5:302019-09-02T18:14:10+5:30
टेंपल गार्डनमध्ये अडीच कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सूर्य, चंद्र, तारे आदींसंबंधी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच कुतूहल लागून असते; मात्र त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे उभ्या आयुष्यात भल्याभल्यांना जमत नाही. ही उणिव भरून काढण्याचा प्रयत्न वाशिम नगर परिषदेने केला असून त्यासाठी नव्याने आकारास आलेल्या टेंपल गार्डनमध्ये अडीच कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उभारण्यात आले आहे. हैद्राबाद येथील बिरला प्लनेटोरियम आणि मुंबई येथील नेहरू तारांगण अॅकेडमीच्या धर्तीवर वाशिममध्येही आता यामाध्यमातून नागरिकांना ब्रम्हांडाची अनुभूती घेता येणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना अंतराळातील घडामोडींचे ज्ञान अवगत व्हावे, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशातून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वाशिम नगर परिषदेने आंतरराष्ट्रीय दर्जाचे तारांगण उभारले असून त्याचे काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत उच्च दर्जाचे होलोग्राफीक तंत्रज्ञान अवलंबून ब्रम्हांडातील ग्रह, उपग्रह, आकाशगंगेची अनुभूती करून दिली जाणार आहे. दरम्यान, या तारांगणाचे काम पूर्ण झाले असून ते मंगळवारपासून लोकांच्या सेवेत सुरू करण्यात येत आहे.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या अडीच कोटी रुपयांच्या निधीतून वाशिम नगर परिषदेने तारांगणचे काम पूर्ण केले आहे. यामाध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही अंतराळ, ब्रम्हांडातील घडामोडींचे ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तारांगणमध्ये चार प्रोजेक्टरच्या सहाय्याने अगदी आरामात हे ज्ञान अवगत करण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. या तारांगणचे लोकार्पण मंगळवारी होत आहे.
- वसंत इंगोले
मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम