आता मार्ग बदलून होतेय उंट तस्करी; टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:27 AM2021-03-15T11:27:46+5:302021-03-15T11:28:03+5:30
Camel smuggling आता पुसदमार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी उंट नेले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
- शिखरचंद बागरेचा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उंटांची तस्करी करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, आता पुसदमार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी उंट नेले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
मध्यप्रदेशातील महू (इंदौर) येथून सहा उंटांचा कळप घेऊन योगेश हुकमचंद प्रजापती (महू) व भीमराव बुद्धू राठोड (मुखेड, नांदेड) हे दोघे रविवार, १४ मार्च रोजी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास अमरावती - हैद्राबाद या चौपदरी महामार्गावरून कारंजा ते मंगरुळपीर मार्गाने जात असल्याचे आढळून आले. याबाबत संबंधितांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. यावेळी त्यांना उंट कोठून आणले आणि कुठे घेऊन जात आहात, असे विचारले असता मध्यप्रदेशातील महू (इंदौर) येथून आणले आणि अनसिंग (ता. वाशिम) येथे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. उंट २५ ते ३० हजारांत विकत घेतल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, त्याबाबत त्यांच्याकडे कुठलाही अधिकृत पुरावा आढळला नाही. अनसिंग येथे कोणाकडे हे उंट देणार, या प्रश्नावर त्यांनी मेंढपाळ व लहान मुलांना खेळविण्यासाठी अनेक व्यावसायिक विकत घेण्यास इच्छुक असल्याची माहिती दिली. परंतु संबंधित दोघेही यावेळी घाबरलेले होते. पोलीस प्रशासनाने याप्रकरणी सखोल चौकशी करून उंटांच्या तस्करीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी होत आहे.