आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:30+5:302021-06-25T04:28:30+5:30
कानांचे आजार प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत. त्यात सर्दी होऊन कान दुखणे आणि दुसरा प्रकार म्हणजे कानाच्या पडद्याला छीद्र असणे ...
कानांचे आजार प्रामुख्याने दोन प्रकारचे आहेत. त्यात सर्दी होऊन कान दुखणे आणि दुसरा प्रकार म्हणजे कानाच्या पडद्याला छीद्र असणे किंवा कानाच्या मागच्या हड्डीमध्ये ‘इन्फेक्शन’ होणे. यातील पहिल्या प्रकारात साध्या उपचारानंतरही रुग्ण ठणठणीत बरे होतात. मात्र, दुसऱ्या प्रकारातील रुग्णांना नियमित काळजी घ्यावी लागते. कान सतत ओले राहात असतील तर बुरशी निर्माण होऊ शकते. त्यामुळे कान नियमित कोरडे ठेवायला हवे. हेडफोनचा कामापुरताच वापर करायला हवा. कान टोकदार वस्तूने कधीच कोरू नये. कान दुखू लागल्यास किंवा त्यातून पाणी येत असल्यास तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.
................
कोट :
विशेषत: पावसाळ्यात काळजी न घेतल्यास कानांचे जुने आजार बळावतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहाणे गरजेचे आहे. कानात होणारा मळ हा कानांच्या संरक्षणासाठी महत्त्वाची बाब आहे. बोलताना जबड्याची हालचाल झाल्यानंतर तो आपसूकच कानातून निघून जातो. त्यासाठी कान कोरण्याची गरज नाही. कानात तेल कधीच टाकू नये किंवा कानात पाणी मारू नये.
- डाॅ. संतोष बेदरकर
................
कोरोना किंवा म्युकरमायकोसिसचा कानांच्या आजारांशी कुठलाही संबंध नाही. मात्र, कानांच्या आजारांकडे दुर्लक्ष करणे हानीकारक ठरू शकते. कोण काय बोलतो, हे ऐकण्याकरिता कान सुदृढ असणे आवश्यक आहे. त्यामुळे कान नियमित स्वच्छ ठेवायला हवेत. तेल टाकून किंवा टोकदार वस्तूने कान कोरल्याने दिलासा मिळण्याऐवजी धोका वाढू शकतो, हे लक्षात ठेवावे.
- डाॅ. मधुकर गुट्टे
...................
काय घ्याल काळजी?
शरीरावरील अत्यंत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असलेले कान सुरक्षित राहाणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येकाने कानांची काळजी घ्यायला हवी. पावसात बाहेर पडत असाल तर दोन्ही कान व्यवस्थितरित्या झाकून घ्या. आंघोळ करताना कानांमध्ये पाणी जाऊ नये, यासाठी कापसांचे बोळे टाका.
कानातील मळ जबड्याच्या हालचालींमुळे आपसूकच निघून जातो. त्यामुळे टोकदार वस्तू किंवा गाडीच्या चाव्यांनी कान कोरणे तत्काळ बंद करायला हवे.
........................
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
१) पावसाळ्यात भिजल्यानंतर कान बराचवेळ तसेच ओले राहिल्यास धोका उद्भवू शकतो. त्यामुळे सर्वांत आधी कान कपड्याने कोरडे करून घ्यायला हवे. पावसात भिजल्यानंतर सर्दी झाल्यास त्याचा थेट असर कानदुखीवरही होऊ शकतो.
कानांचा जुना आजार आधीच जडलेला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कानांचे विकार असलेल्यांनी पावसांत भिजूच नये किंवा कान व्यवस्थितरित्या झाकूनच बाहेर पडावे. पाऊस आणि थंडीमुळे कान दुखण्याचा प्रकार बळावू शकतो.