आता १ लाखापर्यंत थेट कर्ज योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:49 PM2018-12-26T12:49:42+5:302018-12-26T12:50:51+5:30
वाशिम : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील पात्र लाभार्थींना आता लघु उद्योग उभारण्यासाठी २५ हजार रुपयांऐवजी १ लाख रुपयापर्यंत थेट कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील पात्र लाभार्थींना आता लघु उद्योग उभारण्यासाठी २५ हजार रुपयांऐवजी १ लाख रुपयापर्यंत थेट कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. २१ डिसेंबर रोजीच्या शासन आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय यंत्रणेला मिळालेल्या आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २५ हजार रुपयाचे कर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. लहान उद्योगांसाठी लागणाºया भांडवली वस्तू तसेच पायाभूत गुंतवणुकीतील वाढ, कच्चा माल दरवाड व सतत होणारी महागाई निर्देशांकातील वाढ पाहता अनुसूचित जातीच्या जास्तीत जास्त लोकांना कर्ज योजनांचा लाभ घेता यावा आणि महामंडळाच्या योजना प्रभावीपणे राबविता याव्यात या दृष्टिकोनातून थेट कर्ज योजनेंतर्गत कर्जाची मर्यादा २५ हजार रुपयांऐवजी २१ डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार एक लाख रुपये करण्यात आली आहे. कर्ज योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून दोन हप्त्यात कर्जाची रक्कम दिली जाणार आहे. महामंडळाचा सहभाग (४ टक्के व्याजदराने) ८५ हजार रुपये, अनुदान १० हजार रुपये, लाभार्थी हिस्सा पाच हजार रुपये असे एक लाख रुपये मिळणार आहेत. तीन वर्षात कर्जाची परतफेड करावी लागणार असून, पहिला हप्ता ७१ हजार २५० रुपये आणि प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणत: तीन महिन्यानंतर क्षेत्रीय अधिकाºयांनी केलेल्या तपासणी अभिप्रायानुसार २३ हजार ७५० रुपये असा दुसरा हप्ता दिला जाणार आहे.
मागासवर्गीय घटकातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, बँकेमार्फत कर्ज देताना येणाºया अडचणी व कर्ज मंजूर होताना होणारा विलंब टाळणे, लघु व्यवसाय करण्यासाठी तात्काळ वित्त पुरवठा करणे आदी उद्देशातून सदर योजना राबविण्यात येत आहे.
या लघु उद्योगांसाठी मिळणार कर्ज
मोबाईल सर्व्हिसिंग व रिपेअरिंग, इलेक्ट्रीशीयन, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअरिंग, ब्यूटीपार्लर, ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग, फुड प्रॉडक्टस व प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल व स्टेशनरी स्टोअर, मेडीकल स्टोअर, हार्डवेअर, वेल्डींग व सॅनेटरी शॉप, प्रिंटींग, शिवणकला, झेरॉक्स, हॉटेल, फास्ट फुड किंवा ज्यूस सेंटर, क्लॉथ व रेडीमेड गारमेंट शॉप, शेतीशी निगडीत पुरक व्यवसाय आदींसाठी वित्त पुरवठा केला जाणार आहे.