आता २०० लोकांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:48 AM2021-08-18T04:48:39+5:302021-08-18T04:48:39+5:30
वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने लग्न समारंभातील उपस्थितीवरील बंधनेही काही अंशी शिथिल झाली आहेत. आता २०० लोकांच्या उपस्थितीत ...
वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने लग्न समारंभातील उपस्थितीवरील बंधनेही काही अंशी शिथिल झाली आहेत. आता २०० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभाला सूट मिळाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लग्न समारंभावर बऱ्याच मर्यादा आल्या होत्या. ५० जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पाडणे बंधनकारक होते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लग्न समारंभातील उपस्थितींची पडताळणीदेखील प्रशासनातर्फे केली जात होती. नियमाचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने जिल्ह्यातील २० पेक्षा अधिक मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली. जून महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. ऑगस्ट महिन्यात तर कोरोनाची दुसरी लाट संपली आहे. दैनंदिन दोन, तीन असे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना नियंत्रणात असल्याने १५ ऑगस्टपासून निर्बंधातही बऱ्याच अंशी शिथिलता आली आहे. आता लग्न समारंभात २०० जणांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे वधू-वर पित्यांबरोबरच मंगल कार्यालये, बॅन्डवाले, नातेवाईकांमघ्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
०००००००००००००
लग्न समारंभासाठी या आहेत अटी !
मंगल कार्यालय : बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के असेल. परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत असेल.
लॉन : खुल्या प्रांगणातील, लॉनवरील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉनमधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने; परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.
००००००००००००००००००
मंगल कार्यालयांत उत्साहाला उधाण
कोट
कोरोनामुळे मध्यंतरी मंगल कार्यालय, लॉनवर मर्यादा होत्या. त्यामुळे आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. आता २०० जणांच्या उपस्थितीला मुभा देण्यात आल्याने थोडा दिलासा मिळत आहे.
- शिवाजी वाटाणे, मंगल कार्यालय प्रमुख, वाशिम
.......
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने निर्बंध आणखी शिथिल झाले आहेत. यामध्ये मंगल कार्यालयांचादेखील समावेश असून, उपस्थिती मर्यादा वाढल्याने वर-वधू पिता, नातेवाईकांसह सर्वांनाच दिलासा मिळाला.
- भाऊ काळे, मंगल कार्यालय प्रमुख, वाशिम
००००००००००००००
कोट
कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला. आता निर्बंधात सूट मिळाल्याने लग्नसराईची धूम राहणार आहे. चालू वर्षातही बऱ्याच तिथी आहेत.
- विनायक वसंतराव पाठक
पुरोहित, वाशिम
००००
रोजी सुरू झाल्याने बँडवालेही जोरात
कोट
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लग्न समारंभ, मिरवणूक, बॅन्डपथक आदींवर कडक निर्बंध होते. त्यामुळे रोजगार नव्हता. आता निर्बंध शिथिल झाल्याने थोडाफार रोजगार मिळण्याची आशा आहे.
- संजय कांबळे, बॅन्डवाले
................
कोट
उन्हाळ्यात लग्नसराईचा हंगाम होता. मात्र, निर्बंधामुळे बॅन्डपथकांना रोजगार नव्हता. आता निर्बंध शिथिल झाले. मात्र, उन्हाळ्यासारख्या लग्न तिथी फारशा नाहीत. रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- अशोक ताकतोडे, बॅन्डवाले
०००००००००००००