आता गावपातळीवर लसीकरण जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 06:17 PM2021-06-13T18:17:08+5:302021-06-13T18:17:22+5:30
Corona vaccination : गावपातळीवर लसीकरणाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.
वाशिम : कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणावर भर दिला जात असून, ग्रामीण भागातील गैरसमज दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी चार दिवसांपूर्वी दिले. त्यानुसार गावपातळीवर लसीकरणाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसºया लाटेत जनजीवन अधिक प्रभावित झाले. ग्रामीण भागातही अधिक संख्येने कोरोना रुग्ण आढळून आले. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरण, लसीकरणावर भर देण्यात येत आहे. ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, काही नागरिकांमध्ये लसीकरणासंदर्भात गैरसमज असल्याने काही ठिकाणी अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात काही गैरसमज असल्यास ते दूर करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती मोहीम हाती घ्यावी. तलाठी, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने घरोघरी जावून लोकांना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी केल्या. या अनुषंगाने ग्रामीण भागात लसीकरण जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.
कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळे ४५ वर्षावरील नागरिकांनी कोणताही गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
- डॉ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम