आता वीकेंड घरातच, हॉटेलिंग राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:26 AM2021-06-27T04:26:31+5:302021-06-27T04:26:31+5:30
राज्य शासनाच्या आदेशावरून वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधांची नवी नियमावली जाहीर केली आहे. हे नियम सोमवार २८ जूनपासून १२ जुलैपर्यंत कायम ...
राज्य शासनाच्या आदेशावरून वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधांची नवी नियमावली जाहीर केली आहे. हे नियम सोमवार २८ जूनपासून १२ जुलैपर्यंत कायम राहणार आहेत. त्यानुसार, सोमवार ते शुक्रवार या कालावधीत हॉटेलिंग दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे; तर शनिवार व रविवारी पूर्णत: बंद राहणार आहे.
.....................................
सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता राहणार
नव्या नियमावलीनुसार जिल्ह्यातील हॉटेल्स प्रत्येक आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे. या काळात ५० टक्के क्षमतेनुसार डाईन इनची परवानगी देण्यात आली.
आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवारच्या दिवशी दिवसभर हॉटेल्स बंद राहणार असून पार्सल व होम डिलिव्हरीला मुभा असणार आहे.
.........................
हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?
डेल्ट व डेल्टा प्लस व्हेरियंटचे विषाणू आढळत असल्याचे कारण समोर करून शासनाने पुन्हा हॉटेल व्यवसायावर गदा आणली आहे. यामुळे आर्थिक संकट कोसळणार असून हा व्यवसायच बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
-
...............
कोरोनाच्या संकटातून दिलासा मिळाला आणि १४ जूनपासून हॉटेल्स पुन्हा सुरू झाली. तेव्हापासून व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत होता. अशात येत्या सोमवारपासून पुन्हा नवे नियम लागू होत असून व्यवसाय विस्कळीत होणार आहे.
- पियूष रंधवे
...........................
हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल
अनेक महिन्यांपासून हॉटेल्स बंद होती. त्यामुळे रोजगार ठप्प होऊन उपासमारीची वेळ ओढवली होती. १४ जूनपासून हॉटेल्स सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला; मात्र, आता पुन्हा हॉटेल्स बंद होणार असल्याने संकट कोसळणार आहे.
- परशुराम चव्हाण
................
कोरोनाच्या संकटकाळात हॉटेल्स बंद राहिल्याने रोजगार हिरावला गेला होता. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा रोजगार मिळून परिस्थिती बदलली आहे. आता मात्र हॉटेल्सची वेळ कमी होऊन शनिवार व रविवारी बंद राहणार असल्याने हाल होणार आहेत.
- प्रमिला गायकवाड
................
१६०
शहरातील एकूण हॉटेल्स
९००
हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी