वन्यप्राण्यांचा उच्छाद वनविभागाच्या नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 02:09 PM2019-08-14T14:09:05+5:302019-08-14T14:09:31+5:30

पिकांची मोठी हानी होत असतानाच शेतकरी, शेतमजुरांचा जीवही धोक्यात येत आहे.

Nuisance of wild animals is beyond the control of the forest department | वन्यप्राण्यांचा उच्छाद वनविभागाच्या नियंत्रणाबाहेर

वन्यप्राण्यांचा उच्छाद वनविभागाच्या नियंत्रणाबाहेर

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत जंगलात चाऱ्याची उपलब्धता नाही. त्यामुळे वन्यप्राणी शेतशिवार आणि लोकवस्तीत धाव घेत आहेत. यात पिकांची मोठी हानी होत असतानाच शेतकरी, शेतमजुरांचा जीवही धोक्यात येत आहे. तथापि, तोकडा निधी, जटील अटीमुळे वनविभागालाही या प्रकारावर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले आहे. वनपरिक्षेत्रातील प्राण्यांना रोखण्यासाठी लावलेले कुंपणही तकलादू आहेत. त्यामुळेच वनविभागाकडे पिकहानीसह मनुष्यहानीबाबत दाखल होणाºया प्रस्तावांची संख्या वाढतच आहे.
जिल्ह्यात वाशिम वनविभागांतर्गत वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव असे चार वनपरिक्षेत्र असून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर जमिनीवर प्रादेशिक वन परिक्षेत्राचा विस्तार आहे. या प्रादेशिक वनपरिक्षेत्रात हरीण, काळविट, निलगाय, माकड, भेकर, रानडुक्कर, अस्वल, तरस, बिबट, ससा, कोल्हा, रानमांजर, सायाळ आदि वन्यप्राण्यांचे अस्तित्व आहे. आता वाशिम जिल्ह्यातील वनक्षेत्रात वाढ झालेली नसली तरी, वन्यप्राण्यांच्या संख्येत खुप वाढ झाली आहे. मर्यादीत असलेल्या वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यासाठी चारा, पाण्याची सोय नसल्याने हे प्राणी लोकवस्ती आणि शेतशिवारात धाव घेत आहेत. त्यामुळे पिक नुकसानाच्या घटनांसह पाळीव प्राण्यांसह मानवावरही या प्राण्यांच्या हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. या प्राण्यांना लोकवस्तीपासून दूर आणि वनपरिक्षेत्रातच राहण्यास बाध्य करण्यासाठी वनविभागाकडून पुरेसे प्रयत्न होत नाहीत. प्रत्यक्षात मर्यादत निधी आणि जटील अटींमुळे वनविभागाच्या प्रयत्नांवरही मर्यादा येत आहेत. वन्यप्राण्यांवर नियंत्रणासाठी वनपरिक्षेत्रालगत कुंपण बांधण्यासह मोठे खंदक खोदण्याची जबाबदारी वनविभागाकडे आहे; परंतु सोहळ काळविट अभयारण्यातील काही भाग आणि काटेपूर्णा अभयारण्यातील काही भाग वगळता इतर कोठेही कुंपण वा खंदक खोदण्यात आलेले नाहीत. त्यातही सोहळ काळविट अभयारण्यातील कुंपण हे तकलादू असल्याने त्याची पार दैना झाली आहे.
 
पीक नुकसानाच्या प्रकारांत वाढ
वाशिम जिल्ह्यात जानेवारी ते मे दरम्यानचा काळ सोडला, तर इतर सर्वच महिन्यात शेतशिवारात पिके उभी असतात. याच पिकांवर रानडुक्कर, माकडे, निलगाई आणि हरणांचे कळप ताव मारून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करतात. यंदा जुन महिन्यापासून आजवर अवघ्या अडिच महिन्यांतच पीक नुकसान झाल्यामुळे वनविभागाकडे तब्बल २९४ प्रस्ताव दाखल झाले आहेत. या प्रकरणांना मंजुरीही देण्यात आली आहे. तथापि, या नुकसानातील भरपाईचे प्रमाण नगण्य असल्याने सर्व शेतकºयांना मिळून केवळ ५ लाख ८६ हजार रुपये मिळाले आहेत. वन्यप्राण्यांच्या मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून, चार महिन्यांत ६ लोक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. तर सहा पाळीव प्राण्यांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे.


बिबट्याचा संचारही वाढला
वाशिम जिल्ह्यांतर्गत येणाºया वनपरिक्षेत्रांतर्गत बिबट्याचे अस्तित्व असून, या हिंस्त्रप्राण्याचाही शेतशिवारात संचार वाढल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव, कारंजा तालुक्यातील एका गावासह मालेगाव तालुक्यात बिबट्याचे वारंवार दर्शन शेतकरी शेतमजुरांना घडत आहे. मालेगाव तालुक्यात किन्हीराजा ते कवरदरी या मार्गावरील बाबनदरीच्या घाटात बिबट्याने रोहीची शिकार करून ठार मारल्याची घटना ४ आॅगस्ट रोजी घडली. यामुळे बिबट्याच्या भितीने किन्हीराजासह या मार्गावरील कवरदरी, पिंपळशेंडा, वाडी रामराव आदी गावांमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


वनपरिक्षेत्राच्या तुलनेत वन्यप्राण्यांची संख्या वाढली आहे. हे वन्यप्राणी जंगलातच थांबावेत म्हणून वनपरिक्षेत्रालगत खंदक खोदणे, कुंपण उभारणे आदि कामे करता येतात; परंतु यापुढे शेतशिवारातील वन्यप्राण्यांचा संचार रोखण्यासाठी कुठलीही उपाय योजना आम्हाला करणे शक्य नाही आणि त्याच्या काही सुचनाही नाहीत. पीक नुकसान किं वा मनुष्यहानीबाबत दाखल प्रस्तावांना निर्धारित निकषानुसार मदत केली जाते.
-किशोर येळे, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू)
प्रादेशिक वनविभाग वाशिम

Web Title: Nuisance of wild animals is beyond the control of the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.