वाशिम जिल्हयात ‘ग्रीन आर्मी’ सदस्यांची संख्या पोहचली १० हजारांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 03:48 PM2017-12-11T15:48:57+5:302017-12-11T15:50:46+5:30
वाशिम: वृक्षलागवड, संवर्धनाच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी शासनाने ‘ग्रीन आर्मी’ची संकल्पना अंमलात आणली असून याअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १० हजार नागरिकांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी करून सदस्यत्व स्विकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वाशिम: एकीकडे वृक्ष लागवड, संवर्धनावर विशेष भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र काही समाजविघातक प्रवृत्तींकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. त्यास पायबंद घालण्यासाठी तद्वतच वृक्षलागवड, संवर्धनाच्या विविध उपक्रमांना गती देण्यासाठी शासनाने ‘ग्रीन आर्मी’ची संकल्पना अंमलात आणली असून याअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १० हजार नागरिकांनी ‘आॅनलाईन’ नोंदणी करून सदस्यत्व स्विकारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शासनाने येत्या ३ वर्षात एकूण ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. त्याकरिता अपुºया पडणाºया मनुष्यबळाच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात वाशिम-रिसोड, मेडशी-मालेगाव आणि कारंजा-मानोरा असे तीन वनपरिक्षेत्र असून २४ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र वनाच्छादित आहे. वनांचा हा परिसर सागवानसह विविध वृक्षांनी व्यापलेला आहे. दरम्यान, वनांमधील वृक्षतोडीवर नियंत्रण मिळवून वृक्षसंवर्धन, संगोपन व्हायला हवे. यासह वृक्षलागवडीवर विशेष भर देण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसार, वनविभागाने प्रयत्न चालविले असून त्यात बहुतांशी यश देखील मिळत आहे. त्यात ‘ग्रीन आर्मी’ सदस्यांचेही योगदान लाभत असल्याची माहिती वाशिम वनपरिक्षेत्राधिकारी एस.व्ही.नांदुरकर यांनी दिली.