चाचण्यांच्या प्रमाणात रुग्णसंख्या होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:24+5:302021-05-07T04:43:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : लवकर निदान व उपचार मिळावे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, ...

The number of patients in the tests is low | चाचण्यांच्या प्रमाणात रुग्णसंख्या होतेय कमी

चाचण्यांच्या प्रमाणात रुग्णसंख्या होतेय कमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : लवकर निदान व उपचार मिळावे, या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, मार्च, एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याचे काहीसे दिलासादायक चित्र समोर येत आहे. चाचण्यांच्या तुलनेत रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च, एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली. एप्रिल महिन्यापासून कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला कोरोनाबाधितांच्या वाढीचा आकडा सरासरी ४०० ते ५०० दरम्यान होता. मात्र, त्यावेळी चाचण्यांची संख्या कमी असल्याने पॉझिटिव्हिटी दर १६ ते २२ टक्क्यांपर्यंत होता. मे महिन्यात चाचण्यांची संख्या वाढली असली, तरी दैनंदिन रुग्णसंख्या जवळपास स्थिर असल्याने पॉझिटिव्हिटी दर १३ ते १५ टक्क्यापर्यंत खाली आला आहे.

............................

ग्रामीण भागातही टेस्टिंग वाढले!

जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष शिबिर घेऊन चाचण्या करण्यात येत आहेत.

गर्दीच्या ठिकाणी तसेच चेकपोस्ट येथेही कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. चाचण्यांची संख्या वाढविली असली, तरी रुग्णसंख्या स्थिर असल्याने कोरोनाबाधितांच्या टक्केवारीच्या प्रमाणात घट येत असल्याचे दिसून येते.

सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोनासदृश लक्षणे दिसून येताच आजार न लपविता तातडीने चाचणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आहे.

..........................

---------------------

शहरातील चाचण्या, रुग्ण व पॉझिटिव्हिटी दर

तारीख चाचण्या रुग्ण पॉझिटिव्हिटी दर

१ एप्रिल १८५१ ३०१ १६.२६

८ एप्रिल २१६८ १९६ ०९.०४

१५ एप्रिल २५८१ ५६९ २२.०४

२१ एप्रिल २०१७ ३८७ १९.१८

२८ एप्रिल २८२२ ५२४ १८.५६

१ मे ३५६९ ६८० १९.०५

२ मे २५८६ ४२४ १६.३९

३ मे ३६४९ ५८२ १५.९४

४ मे ३२६६ ४४७ १३.६८

-----------------

‘आरटीपीसीआर’चे अहवाल अधिक पॉझिटिव्ह

कोरोना संसर्ग झाला आहे का हे तपासणीसाठी ७० टक्के चाचण्या या ‘आरटीपीसीआर’व्दारे, तर ३० टक्के चाचण्या या अ‍ॅन्टिजेन रॅपिडव्दारे करण्यात येत आहेत. ‘आरटीपीसीआर’व्दारे करण्यात येणारी कोरोना चाचणी ही अ‍ॅन्टिजेन चाचणीच्या तुलनेत अधिक अचूक असते; तर अ‍ॅन्टिजेनमध्ये अचूकतेचे प्रमाण हे ५० ते ६० टक्केच आहे. त्यामुळे लक्षणे असलेल्या अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह अहवाल आला, तर त्या रुग्णास पुन्हा ‘आरटीपीसीआर’ व्दारे चाचणी करण्यास सांगण्यात येते. अनेकवेळा रुग्ण थेट रुग्णालयात दाखल होतात. त्यावेळी तात्काळ चाचणी करून, अहवाल प्राप्तीसाठी अ‍ॅन्टिजेन रॅपिड टेस्ट उपयोगी पडते. परंतु, काही वेळेत लक्षणे असूनही अ‍ॅन्टिजेन टेस्टमध्ये अहवाल निगेटिव्ह येत असतो, त्यामुळे अशा रुग्णांची पुन्हा ‘आरटीपीसीआर’व्दारे चाचणी घेण्यात येते.

.............

कोट

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. मार्च, एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात कोरोना पॉझिटिव्हिटी दर कमी होत असल्याचे तुर्तास तरी दिसून येत आहे. नागरिकांनीदेखील अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नेहमी मास्कचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये.

- डॉ. अविनाश आहेर,

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.

Web Title: The number of patients in the tests is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.