विद्यार्थी संख्या घटली निम्म्याने!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:02 AM2017-07-19T01:02:10+5:302017-07-19T01:02:10+5:30
जि.प. शाळांमधील वास्तव : इंग्रजी शाळांचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो. स्टे. : आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली शहरी भागासह आता ग्रामीण भागातही इंग्रजी व खासगी शाळांची संख्या भरमसाठ वाढत असून, त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांवर होत आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत दोन वर्षांपूर्वी असलेली ३०० विद्यार्थीसंख्या घटून यंदा हा पट तब्बल १५६ पर्यंत उतरला आहे.
ग्रामीण भागात ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुले शासनाच्या एकात्मिक बाल व विकास योजनेंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेतात. तसेच ६ वर्षे वयोगटापुढील विद्यार्थ्यांना पूर्वी जिल्हा परिषद शाळा हेच शिक्षणाचे मुख्य माध्यम होते. अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद शाळा मोफत पाठ्यपुस्तके, पोषण आहार, गणवेष यासह विविध शिष्यवृत्ती योजना देऊ करीत असल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचेही समाधान होत असे; परंतु सध्या ग्रामीण भागातही इंग्रजी शिक्षणाचे वेड पसरले असून, लहान-लहान मुलांकडून पालकांच्या अवास्तव अपेक्षा वाढल्या आहेत.
इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेणे ही बाब प्रतिष्ठेची झाली असून, इंग्रजी शाळेत दोन वर्षांपासून शिक्षणासोबतच टापटिप राहण्याचे धडे दिले जातात. तथापि, परिसरातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळा आता डिजिटल झाल्या असून, त्या ठिकाणी शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत; मात्र पालकांचा ओढा इंग्रजी शाळांकडेच अधिक असून, त्यांच्या मनातून इंग्रजी शाळांचे भूत काही केल्या उतरत नसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शासन शिक्षकांचेही प्रयत्न कमी पडत असून, यामुळेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात घट होत आहे. आसेगावपासून जवळच असलेल्या नांदगाव येथील जिल्हा परिषद शाळेबाबतही हाच प्रकार घडला असून, तेथे पूर्वी ७ वर्गतुकड्या होत्या. त्या आता मोडकळीस आल्या असून, वर्गखोल्या चार आणि पटसंख्या ३२ पर्यंत खालावली आहे.