नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे वाढली विद्यार्थी संख्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:03 PM2020-01-13T15:03:09+5:302020-01-13T15:03:37+5:30
विविध उपक्रमांमुळे आता शाळेच्या पटसंख्येचा आलेख चढता आहे. सन २०१८-१९ मध्ये ८४ आणि २०१९-२० मध्ये ९१ पटसंख्या आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चार वर्षांपूर्वी विद्यार्थी संख्या कमी असणाऱ्या मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रमासह जादा शिकवणी वर्गावर भर देण्यात आला. याचे सकारात्मक परिणाम समोर आले असून, दरवर्षी विद्यार्थी संख्या वाढत असल्याचे दिसून येते.
खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसतात, असे म्हटले जाते. पूर्वीच्या तुलनेत आता जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही लोकवर्गणी व शासन निधीमधून भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील जिल्हा परिषद शाळेतही लोकवर्गणी व शासन निधीतून भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. आकर्षक रंगरंगोटी तसेच निसर्गरम्य वातावरण निर्मिती करण्यात आली. वारंगी येथे वर्ग पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून येथील पटसंख्या सन २०१७-१८ मध्ये ७६ होती. शाळेमध्ये विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली. नवोदय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष शिकवणी वर्ग घेण्यात येतात. डिजिटल शाळा असल्याने विद्यार्थ्यांना हसत-खेळत शिक्षण मिळणेही सुलभ झाले आहे. विविध उपक्रमांमुळे आता शाळेच्या पटसंख्येचा आलेख चढता आहे. सन २०१८-१९ मध्ये ८४ आणि २०१९-२० मध्ये ९१ पटसंख्या आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून अध्यापन केले जात असल्याने ते समजण्यास सुलभ जात आहे.
विविध स्पर्धांवर भर
जिल्हा परिषद वारंगी शाळेत विविध स्पर्धा घेण्यात येतात. विविध स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, स्टेज डेअरिंग, व्यावहारिक ज्ञान, अंगभूत गुणांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रांगोळी, हस्ताक्षर, कागदी वस्तू बनविणे, गाव स्वच्छता मोहिमेत सहभाग, वेशभूषा, वर्ग सजावट आदी स्पर्धा घेतल्या जातात. विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून २०१८-१९ मध्ये १८ हजार रुपयांची बक्षीस प्राप्त झाली.
गावकरी मंडळी, पालक व शिक्षकांच्या सहकार्यामुळेच शाळेची प्रगती व विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जात आहे. नाविण्यपूर्ण उपक्रमावर भर आहे.
- गजानन बळी, मुख्याध्यापक
शिकविण्याबरोबरच विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात मुख्याध्यापक, शिक्षकांची मोलाची भूमिका आहे.
- विजय हेंबाडे, पालक