वन्यप्राण्यांच्या अपघातांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:35+5:302021-07-28T04:43:35+5:30
वाशिम : शिवारात चारा-पाण्यासाठी शेतशिवारासह लोकवस्तीकडे धाव घेणाऱ्या वन्यप्राण्यांचा विविध अपघातांत बळी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय मोकाट कुत्र्यांचेही ...
वाशिम : शिवारात चारा-पाण्यासाठी शेतशिवारासह लोकवस्तीकडे धाव घेणाऱ्या वन्यप्राण्यांचा विविध अपघातांत बळी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय मोकाट कुत्र्यांचेही हल्ले वाढल्याने जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. या पृष्ठभूमीवर वन विभागाने ठोस उपाययोजना करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत झालेली वारेमाप जंगलतोड आणि जंगलात चारा-पाण्याचे मर्यादित स्त्रोत असल्याने वन्यप्राणी शिवारासह लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. यासाठी रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहनांची धडक लागून वन्यप्राण्यांचा जीवही जात आहे. त्यातच आता महामार्गांची कामे झाल्याने वाहनांचा वेग दुपटीने वाढला आहे. अशात रस्त्यावर धावणाऱ्या वन्यप्राण्यांना वेगाने येत असलेल्या वाहनांपासून वाचण्याची संधीच मिळत नाही. अशा अपघातामुळे वाहन चालविणाऱ्यांसह प्रवाशांचाही जीव धोक्यात येत आहे. त्यात लोकवस्ती किंवा शिवारात चरताना मोकाट कुत्र्यांच्या नजरेस पडल्यावर मोकाट कुत्रेही वन्यप्राण्यांवर हल्ला करून त्यांचे लचके तोडतात. या प्रकारामुळे गेल्या वर्षभरात १५ पेक्षा अधिक वन्यप्राण्यांचा रस्ता अपघात व मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जीव गेला आहे. निलगाय, माकड, हरिण, रानडुक्कर, काळवीट आदी वन्यप्राण्यांचा यात समावेश आहे. अशात वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने जंगलाच्या सभोवताली मोठमोठे खंदक किंवा चर खोदणे आवश्यक आहे.
-------------------------
मोकाट कुत्र्यांनी केले काळवीट ठार
शिवारात चाऱ्यासाठी भटकत असलेल्या एका काळविटावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. यात काळविटाचा मृत्यू झाला. यासंदर्भात वनविभागाला वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन टीमच्या सदस्यांनी माहिती दिली. ही घटना २५ जुलैरोजी मंगरुळपीर तालुक्यात घडली. गरुळपीर तालुक्यातील शेतकरी गोपाल गिरे यांच्या शेतालगत एक काळवीट चाऱ्याच्या शोधात भटकत होते. मोकाट कुत्र्यांना हे काळवीट दिसताच त्यांनी काळविटावर हल्ला केला. गोपाल गिरे यांनी कुत्र्याच्या तावडीतून काळविटाची सुटका केली आणि मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे व वनविभागाला माहिती दिली; परंतु काळवीट गंभीर जखमी झाल्याने वन विभागाचे कर्मचारी दाखल होण्यापूर्वीच काळविटाचा मृत्यू झाला होता.