कोरोना लस घेण्यात नर्स सर्वात पुढे; डाॅक्टर मागे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:55 PM2021-02-09T13:55:44+5:302021-02-09T13:55:53+5:30
Corona Vaccine News लस घेण्यात नर्स व सुपरवायझर सर्वात पुढे असून, डाॅक्टर्स सर्वात मागे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ १६ जानेवारी रोजी झाला असून, आतापर्यंत ५३२४ पैकी ३६४५ फ्रंटलाइन वर्कर्स यांनी लस घेतली आहे. लस घेण्यात नर्स व सुपरवायझर सर्वात पुढे असून, डाॅक्टर्स सर्वात मागे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध करणाऱ्या कोविशिल्ड लसीचे ६५०० डोस जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय, कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणि मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालय या तीन ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यात अजूनही काही जण उत्सुक नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पहिल्या टप्प्यात ५३२४ फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. आतापर्यंत ३६४५ जणांनी लस घेतली आहे. यामध्ये नर्स आणि सुपरवायझर तसेच पॅरामेडिकल स्टाफ यांची टक्केवारी ९१ तर डाॅक्टरांची टक्केवारी ८४ आहे. फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यानंतर महसूल व पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.
कोरोना लसीकरण टाळण्यासाठी दिलेल्या कारणांची मोठी यादी
कोरोना विषाणू प्रतिबंधक लस ही पूर्णपणे सुरक्षित असून, अधिकाधिक फ्रंटलाइन वर्कर्स यांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने वारंवार केले. मात्र, विहित मुदतीत कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
लस घेण्यासंदर्भात संबंधित कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर संदेश प्राप्त होतो. मात्र, सध्या बाहेरगावी आहे, तब्येत ठीक नाही, नंतर लस घेतो असे म्हणत अनेक जण लस घेण्याला सोयीस्कररीत्या बगल देत असल्याचे समोर येत आहे.
अन्य जिल्ह्यात काही जणांना कोरोना लसीकरणानंतर ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशी साैम्य लक्षणे आढळून आली. त्यामुळे अजूनही काही फ्रंटलाइन वर्कर्स यांच्या मनात कोरोना लसीकरणाविषयी धाकधूक असल्याचे दिसून येते.