नर्सरी ते केजीच्या मुलांचे पुढील वर्षही घरातच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:09+5:302021-05-25T04:46:09+5:30
वाशिम शहरात नर्सरीपासून युकेजीचे शिक्षण देणाऱ्या २५ शाळा आहेत. त्यात २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात १६९६ विद्यार्थी प्रवेश झाले होते; ...
वाशिम शहरात नर्सरीपासून युकेजीचे शिक्षण देणाऱ्या २५ शाळा आहेत. त्यात २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात १६९६ विद्यार्थी प्रवेश झाले होते; मात्र, जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोनाच्या संकटाला सुरुवात झाल्यानंतर त्याच्या काहीच दिवसांत खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्वच ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचे फर्मान शासनस्तरावरून सोडण्यात आले. त्याची अंमलबजावणी करण्यात येऊन नर्सरी ते युकेजीच्या शाळाही तेव्हापासून आजतागायत बंद आहेत. यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून मुले घरातच असून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुढील वर्षही घरातच जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
..................
शहरातील नर्सरी टू केजीच्या शाळा - २५
२०१८-१९ - १५००
२०१९-२० - १५४५
२०२०-२१ - १६९६
विद्यार्थीसंख्या
........................
प्रतिक्रिया :
वर्षभर कुलूप; यंदा?
कोरोनाचे संकट दिवसागणिक अधिकच गंभीर होत चालले आहे. त्यामुळे यंदाही शाळा सुरू होतील किंवा नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने कुठलाही धोका पत्करता येत नाही. २६ जूनला नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्याची शक्यता नाही.
- हरिभाऊ क्षीरसागर
...............
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून वर्षभरापासून शाळा कुलूपबंद आहेत. त्यात नर्सरी ते केजीचाही समावेश आहे. इयत्ता पहिलीपासून ऑनलाईन शिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले; मात्र वय कमी असल्याने नर्सरी ते केजीच्या मुलांसाठी तशी व्यवस्था करता आली नाही.
- दिलीप हेडा
...........
कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा कुलूपबंद आहेत. यामुळे मुलांचा शैक्षणिक विकास खुंटत चालला आहे. नर्सरी ते केजीच्या मुलांना ऑनलाईन शिक्षणही देता येणे अशक्य आहे. उद्भवलेले हे संकट लवकरच निवळले नाही तर भविष्यात या मुलांची पुढील वर्गातील प्रवेश प्रक्रियादेखिल अडचणीत येणार आहे.
- संतोष गडेकर
सचिव, मेस्टा संघटना
..............
प्रतिक्रिया :
पालकही परेशान
कोरोना संसर्गाच्या संकटामुळे नर्सरी ते केजीच्या शाळा बंद असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून मुले घरीच आहेत. सर्वत्र बंद असल्याने आणि भीती कायम असल्याने त्यांना कुठे बाहेर फिरायलाही नेता येत नाही. त्यामुळे त्यांच्यात चिडचिड निर्माण झाली आहे.
- कल्पना एकनाथ कावरखे
.............
माझ्या मुलाला नर्सरीमध्ये शाळेत टाकले होते; मात्र पुढच्याच वर्षी कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. त्यामुळे मुलाचे शिक्षण थांबले आहे. कित्येक महिन्यांपासून घरातच राहावे लागत असल्याने त्याच्यातील चिडचिड वाढली आहे तसेच मोबाईल आणि टी.व्ही. पाहण्याचेही प्रमाण वाढले आहे.
- धनश्री प्रमोद बनसोड
............
कोरोना संसर्गाचे संकट पूर्णत: निवळत नाही, तोपर्यंत शासनाने शाळा सुरू करूच नयेत, असे माझे स्पष्ट मत आहे. मोठी माणसे त्रास होत असल्यास सांगू शकतात; पण मुलांच्या बाबतीत तसे नाही. घरीच राहून ते चिडचिड करताहेत, मोबाईल पाहताहेत; पण सुरक्षित आहेत, हेच महत्त्वाचे आहे.
- प्रमोद ढाकरके
......................
(बॉक्स)
मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम; ही घ्या काळजी !
शाळा सुरू असल्यानंतर मुलांचे सकाळपासून सायंकाळपर्यंतचे ‘शेड्यूल्ड’ ठरलेले असते. शिक्षणासोबतच ते मैदानी खेळांमध्येही सहभागी होत असल्याने शैक्षणिक व शारीरीक विकास होतो. दिवसभराचा थकवा आल्यानंतर मुले रात्री लवकर झोपतात. टी.व्ही., मोबाईल कमीच पाहतात. गेल्या काही महिन्यांपासून मात्र ते घरीच राहत असल्याने त्यांच्या मानसिकतेवर निश्चितपणे परिणाम होत आहे. पालकांनी त्यांना समजून घ्यावे, हाच त्यावरील एकमेव उपाय आहे.
- डाॅ. नरेश इंगळे
मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम