परिचारिका, डॉक्टरमध्ये वाद; परस्परविरोधात पोलिसांत तक्रार
By admin | Published: July 15, 2017 01:57 AM2017-07-15T01:57:17+5:302017-07-15T01:57:17+5:30
मानोरा : ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कंत्राटी परिचारिकेत वाद झाल्याची घटना १३ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. परस्परविरोधी तक्रारीहून मानोरा पोलिसांनी १४ जुलै रोजी घटनेची नोंद केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कंत्राटी परिचारिकेत वाद झाल्याची घटना १३ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. परस्परविरोधी तक्रारीहून मानोरा पोलिसांनी १४ जुलै रोजी घटनेची नोंद केली.
वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश राठोड यांच्या फिर्यादीनुसार, ग्रामीण रुग्णालयात सेवा देत असताना १३ जुलैच्या रात्री ८ वाजता तेथेच कार्यरत असलेल्या परिचारिका मंदा तुळशिराम घोरसडे (२६) या त्या ठिकाणी आल्या. थकीत असलेल्या वेतनासंदर्भात त्यांनी डॉक्टरशी वाद घातला. त्यानंतर प्रकरण त्या ठिकाणी न थांबता सदर परिचारिकेने डॉक्टरला चप्पलने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले. घटनेचा निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी १४ जुलै रोजी कामकाज बंद ठेवले; मात्र अत्यावश्यक सेवा सुरु होती.
दरम्यान, सदर महिला परिचारिकेनेदेखील पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीत असे नमूद केले की, निवासस्थानासमोर माझ्या बाळाला घेऊन फिरत असताना, डॉक्टरांनी आवाज दिला. तेव्हा त्यांना मला रिलीव्ह आॅर्डर द्या, असे म्हटले असता, डॉक्टरांनी जातीवाचक शिवीगाळ करीत हात ओढला. त्यामुळे डॉक्टरला चपलाने मारहाण केल्याची फिर्याद दिली. डॉक्टर व परिचारिका यांच्या परस्परविरोधी तक्रारीहून मानोरा पोलिसांनी या घटनेची नोंद केली. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धर्माजी डाखोेरे, बिट जमादार सुभाष महाजन, संदीप बरडे आदी करीत आहेत.
सदर घडलेला प्रकार हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड होईल, अशी माहिती डॉ.महेश राठोड यांनी दिली.