पोषण आहारात आढळल्या अळ्य़ा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:34 AM2017-10-17T01:34:46+5:302017-10-17T01:35:24+5:30

अंगणवाडी केंद्रांतील पोषण आहारांमध्ये अळ्या आढळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. रिसोड तालुक्यातील मांगुळझनक व वडजी येथील पोषण आहारात अळ्या आढळल्याचे दिसून आले. या प्रकाराची दखल घेत आमदार अमित झनक यांनी सोमवारी महिला व बालविकास विभागाला योग्य ती चौकशी करण्याच्या सूचना केल्या.

Nutrition found in the diet! | पोषण आहारात आढळल्या अळ्य़ा !

पोषण आहारात आढळल्या अळ्य़ा !

Next
ठळक मुद्दे आमदार झनकांनी घेतली माहिती नमुने लॅबला पाठविले!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अंगणवाडी केंद्रांतील पोषण आहारांमध्ये अळ्या आढळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. रिसोड तालुक्यातील मांगुळझनक व वडजी येथील पोषण आहारात अळ्या आढळल्याचे दिसून आले. या प्रकाराची दखल घेत आमदार अमित झनक यांनी सोमवारी महिला व बालविकास विभागाला योग्य ती चौकशी करण्याच्या सूचना केल्या.
‘टीएचआर’ (टेक होम रेशन) योजनेंतर्गत अंगणवाडीतील बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पोषण आहार पुरवठय़ाची जबाबदारी काही संस्थांवर सोपविण्यात आली आहे. अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षे वयोगटातील तीव्र, अतितीव्र, कमी वजनाची बालके, गरोदर व स्तनदा मातांना सुदृढ करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पोषण आहार पुरवठा सुरू केला जातो. उपमा, शिर्‍यासाठी पीठ व सातू पीठ (सुकडी) असलेल्या विशिष्ट वजनाच्या सीलबंद पिशव्या दिल्या जातात. लाभार्थींनी हा आहार घरी नेऊन निश्‍चित केलेल्या पाककृतीप्रमाणे पदार्थात टाकून खायचा आहे. आता या पॉकिटसंदर्भात काही गैरप्रकार आढळत असल्याचे समोर येत आहे. रिसोड तालुक्यातील मांगूळ झनक व वडजी येथे या पॉकिटात अळ्या आढळून आल्याने पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा चव्हाट्यावर येत आहे. या प्रकाराची दखल घेत आमदार अमित झनक यांनी सोमवारी पोषण आहाराच्या पॉकिटची पाहणी केली. यावेळी काही गंभीर बाबी आढळून आल्या. उत्पादन निर्मिती केल्याचा तसेच अंतिम मुदतीचा दिनांक आढळून आला नाही, तसेच अन्य अधिकृत माहितीदेखील पॉकिटवर आढळून आली नाही, अशी माहिती अमित झनक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. झनक यांनी तातडीने महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून पोषण आहाराचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना केल्या. रिसोड पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी ठाकूर यांनी अळ्या आढळलेल्या पाकिटातील पोषण आहाराचे नमुने घेऊन अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे सादर केला. या अहवालावरून सदर नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले जाणार आहेत, असे महिला व बालकल्याण विभागाने स्पष्ट केले.

मांगुळझनक व वडजी येथे पोषण आहाराच्या पाकिटमध्ये अळ्या आढळून आल्या असून, यासंदर्भात योग्य ती चौकशी करण्याच्या सूचना महिला व बालकल्याण विभागाला केल्या आहेत. 
- अमित झनक
आमदार, रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघ

Web Title: Nutrition found in the diet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न