ओबीसींनो, आरक्षणाच्या लढाईत सहभागी व्हा ! प्रा. लक्ष्मण हाके : वाशिममध्ये झाली बैठक
By नंदकिशोर नारे | Published: June 28, 2024 07:48 PM2024-06-28T19:48:50+5:302024-06-28T19:49:20+5:30
वाशिम : लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा प्रवर्ग असलेल्या ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण आहे. त्यातच मराठा समाजाने ओबीसीतून ...
वाशिम : लोकसंख्येच्या प्रमाणात मोठा प्रवर्ग असलेल्या ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात अत्यंत कमी आरक्षण आहे. त्यातच मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाचा हट्ट धरल्याने ते सुद्धा धोक्यात आले आहेत. ओबीसी शांत राहिला तर आरक्षण पळविले जाण्याची भीती आहे. त्यामुळे आरक्षण वाचविण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवून लढाईत सहभागी व्हा, असे आवाहन प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे केले.
स्थानिक संत सावता महाराज मंदिर सभागृहात २७ जून रोजी पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, ओबीसींचे आरक्षण अबाधित राहावे, यासाठी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी अभिवादन यात्रा सुरू केली आहे. सिंदखेडराजा येथून त्यास सुरूवात झाली. विविध गावांना भेटी देत ते गुरुवारी वाशिम येथे दाखल झाले. प्रा. हाके म्हणाले, ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी आम्ही लढा उभारला आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याचे त्यांनी सांगितले. सगेसोयरे हा ‘कन्सेप्ट’ संवैधानिक नाही. अशाप्रकारे कुठल्याही कोर्टाचे ‘जजमेंट’ सुद्धा उपलब्ध नाही. सुप्रीम कोर्टासह विविध आयोग व समित्यांनी मराठा समाजाला मागास ठरविलेले नाही. त्यामुळे त्यांना ओबीसीत आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याने प्रा. हाके म्हणाले. बैठकीला सकल ओबीसी बांधवांची उपस्थिती होती.