सुरू होण्यापूर्वीच ‘मेडिकल काॅलेज’च्या मार्गात अडथळा!
By संतोष वानखडे | Published: November 19, 2023 05:20 PM2023-11-19T17:20:52+5:302023-11-19T17:21:15+5:30
जागा निश्चितीचा गुंता सुटेना : विलंबाचे कारणही कळेना
वाशिम : वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल काॅलेज) व त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ जून रोजी मान्यता मिळाली. चार महिन्यांतही जागा निश्चिती झाली नसल्याने काम सुरू होण्यापूर्वीच मेडिकल काॅलेजच्या उभारणीत अडथळा निर्माण होत असल्याचे समोर आले.
जिल्ह्यात सर्वप्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मालेगाव तालुक्यातील चिवरा येथील गट क्रमांक २३८ मधील १५.३९ हे. आर,, गट क्रमांक २८२ मधील ८.९९ हे. आर. आणि गट क्रमांक २८४ मधील ६.५३ हे. आर. मिळून एकूण ३०.९१ हे. आर. (७७.०० एकर) ई-क्लास जमीन शासन निर्णयानुसार प्रस्तावित केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाहीदेखील केली. मात्र, त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा मुख्यालय परिसरात व्हावे या उद्देशातून जागेचे आणखी तीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. यामध्ये सावरगाव बर्डे, झाकलवाडी व वाशिम शहरानजीकच्या एका जागेचा समावेश आहे. यापैकी वाशिम शहरानजीकच्या एका जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. यासंदर्भात दोन महिन्यांतही शासनस्तरावर ठोस निर्णय झालेला नाही.
परिणामी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी महसूलची जागा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास हस्तांतरीत होऊ शकली नाही. महसूलची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावे होण्यास एवढा विलंब कशासाठी? यामागचे कारणही जिल्हावासियांना कळेनासे झाले आहे. जागा कोणतीही असो; पण जिल्ह्यातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अन्यत्र (परजिल्ह्यात) जावू नये, म्हणून लवकरात लवकर जागा निश्चिती व्हावी असा सूर जिल्हावासियांमधून उमटत आहे.