शासकीय कामात अडथळा; वकिलावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 06:17 PM2021-05-23T18:17:42+5:302021-05-23T18:17:48+5:30
Washim News : पोलिसांना उर्मट भाषेत बोलून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहरातील एका वकिलावर २२ मे रोजी गुन्हा दाखल केला.
वाशिम : पेट्रोलिंगदरम्यान मालेगाव शहरात कडक निर्बंधाच्या आदेशाचे उल्लंघन करून पोलिसांना उर्मट भाषेत बोलून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहरातील एका वकिलावर २२ मे रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान, पोलिसांनी वकिलाला विनाकारण अमानुष मारहाण केली आणि फिर्याद न घेतल्यावरून वकील संघाने रविवारी न्यायालयासमोर एकत्र जमून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सरदारसिंग सोनोने यांनी फिर्याद दिली की, २२ मे रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान पोलीस अधीक्षक हे मालेगाव येथे आले असता, यादरम्यान पेट्रोलिंग करीत असताना समोरून येणाºया एम.एच. ३७ व्ही २१२३ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला थांबविले. कडक निर्बंध व संचारबंदी लागू असल्याचे सांगुन बाहेर फिरण्याचे कारण विचारले असता, अॅड. सुदर्शन गायकवाड यांनी अंत्यत उर्मट भाषेत उत्तर दिले. कायदेशीर कारवाई करताना शासकीय अडथळा निर्माण केल्याप्रकरणी भादंवी कलम ३५३, ३३२, १८६, २९४, ५०४, १८८, २६९, २७०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वकिल संघाकडून निषेध
पोलिसांनीच वकिलाला विनाकारण मारहाण केल्याचा उल्लेख करीत वकील संघ व तालुका बार असोसिएशनने या घटनेचा निषेध केला. वकिल संघाने घेतलेल्या ठरावात नमूद केले की, अॅड. सुदर्शन गायकवाड हे शेतातून येत असताना पोलिसांच्या ताफ्याला ओव्हरटेक का केले म्हणून वाहन पोलीस स्टेशनला लावण्यास सांगितले. यावेळी पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने तिला दवाखान्यात न्यायचे आहे, असे सांगितले. याची शहानिशा म्हणून अॅड. गायकवाड यांच्यासोबत एक कमांडो घरी पाठविला. यावेळी कमांडोने बाचाबाची केली तसेच अन्य पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठून शिवीगाळ व मारहाण केली, असे वकिल संघाने घेतलेल्या ठरावात नमूद केले. यावर अॅड. महेश शेलकर, अॅड. एस जे सोमाणी, अॅड. एस. एन. मगर, अॅड. अग्रवाल, अॅड. पुरोहित, अॅड. पवन गट्टानी, अॅड. विजय बळी, अॅड. ज्ञानेश्वर कराळे, अॅड. दिनेश शर्मा, अॅड. कैलाश चतरकर, अॅड. के अन सोळंके, अॅड. बी के साठे यांच्यासह जिल्ह्यातील वकिलांच्या सह्या आहेत.