अडाणमध्ये तिघांचा; दस्तापूरच्या धरणात बुडून एकाचा मृत्यू

By सुनील काकडे | Published: June 17, 2024 08:18 PM2024-06-17T20:18:54+5:302024-06-17T20:19:07+5:30

चारही मुले मुस्लिम समाजातील : कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर

of three in Adan; One died after drowning in Dastapur dam | अडाणमध्ये तिघांचा; दस्तापूरच्या धरणात बुडून एकाचा मृत्यू

अडाणमध्ये तिघांचा; दस्तापूरच्या धरणात बुडून एकाचा मृत्यू

वाशिम : कारंजा तालुक्यातील अडाण धरणात बुडून तिघांचा; तर दस्तापूर (ता.मंगरूळपीर) येथील धरणात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना १७ जून रोजी घडल्या. चारही मृतक मुले २० वर्षांआतील असून मुस्लिम समाजातील आहेत. ऐन ईद सणाच्या दिवशी घडलेल्या या ह्रदयद्रावक घटनेमुळे मृतकांच्या कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

दस्तापूरच्या घटनेसंबंधी मिर हिफाजत अली हाशम अली (आसेगाव पो.स्टे.) यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचा भाचा शे. हुजेफ रियाजोद्दीन (१८, रा.मंगरूळपीर) हा त्याचे मित्र सकलैन शेख फहीम शेख, ओसामा नवाब साहेब, शिज आरीफ मास्टर आणि सै. मुवेद सै. सोहेल यांच्यासमवेत दुपारी १२.३० च्या सुमारास दस्तापूरच्या धरणावर गाडी धुण्यासाठी गेला. मात्र, धरणात उतरलेला शे. हुजेफ रियाजोद्दीन हा परत काठावर आला नाही, अशी माहिती दुपारी ३ वाजताच्या सुमारास मिळाली. त्यामुळे धरणाकडे धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने शे. हुजेफचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह पाण्यात आढळून आला. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

दरम्यान, दस्तापूर येथील धरणात बचावकार्य सुरू असतानाच कारंजा तालुक्यातील पिंपरी फाॅरेस्टनजिकच्या अडाण धरणातही तिघे बुडाल्याची घटना घडली. कारंजातील भारतीपुरा येथील रहिवासी रेहान खान हाफीज खान (१९), साईम करीम शेख (१७) आणि इस्पान अली अर्षद अली (१५) ही तीन मुले अडाण धरणावर पोहण्यासाठी गेली होती. धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला. संत गाडगेबाबा बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांच्या संपूर्ण चमुने प्रयत्नांची पराकाष्ठा करून दोन्ही घटनांमधील मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले.

एकीकडे सणाचा उत्साह; दुसरीकडे आक्रोश
सोमवारी जिल्हाभरात बकरी ईदचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. मात्र, याचदिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या धरणांमध्ये बुडून २० वर्षांआतील चार मुलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या आई-वडिलांचा व कुटूंबातील अन्य सदस्यांचा आक्रोश प्रत्येकाचे डोळे पानावणारा ठरला.

धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
दरवर्षीच्या पावसाळ्यात धरणांमध्ये बुडून अनेकांना प्राणास मुकावे लागते. तथापि, अशा घटना घडूच नये, यासाठी धरण परिसरात किमान दोन ते तीन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करायला हवी, अशी मागणी अनेकवेळा पुढे रेटण्यात आली आहे. मात्र, त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. त्यातूनच १७ जून रोजी पुन्हा चार मुलांना धरणाच्या पाण्याने कायमचे कवेत घेतले. या पृष्ठभूमिवर धरणांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
 

Web Title: of three in Adan; One died after drowning in Dastapur dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.