ग्रामविकास अधिकारी मिळत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी ठोकले मेडशी ग्रामपंचायतीला कुलूप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 05:13 PM2018-10-17T17:13:48+5:302018-10-17T17:14:52+5:30
ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून १७ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.
मेडशी (वाशिम) : येथील ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून १७ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. येथे कायमस्वरुपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी सरपंच रेखा संतोष मेटांगे यांच्यासह उपसरपंच, सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे वारंवार मागणी केली होती.
मेडशी येथील ग्रामविकास अधिकारीपदाचा प्रभार अन्य ग्रामसेवकांकडे सोपविला होता. ते नियमित गावात येत नसल्याने घरकुलांचे प्रस्ताव, अतिक्रमण नियमानुकूल प्रकरणे, अन्य अहवाल, शौचालयांची कामे आदी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली. आठ अ, ग्रामपंचायतीचे ठराव व अन्य प्रमाणपत्र मिळण्यातही अडचणी निर्माण झाल्या, तसेच ग्रामपंचायतीच्या मासिक सभाही बारगळल्या होत्या. पुढील गैरसोय टाळण्यासाठी कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी सरपंच मेटांगे यांच्यासह उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी संदीप कोटकर यांच्याकडे वारंवार केली होती. तथापि, या मागणीकडे गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने गावातील विकासात्मक कामे ठप्प पडली आहे.
जनतेची कामे मार्गी लागावी तसेच विकासात्मक कामांना चालना मिळावी याकरिता मेडशी ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्यात यावे अन्यथा ताला ठोको आंदोलनाचा इशाराही दिला होता. यावरही गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याने 17 आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायतच्या पदाधिका-यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आणि चाबी पंचायत समितीच्या संबंधित कर्मचा-यांकडे सोपविली, अशी माहिती उपसरपंच मूलचंद चव्हाण यांनी दिली. ग्रा. पं. सदस्य समाधान तायडे, शेख जमीर शेख गनिभाई, दत्तराव घुगे, दीपक वानखडे आदिंची उपस्थिती होती. गटविकास अधिका-यांचे ग्रामसेवकांवर नियंत्रण नसल्याने मेडशी येथे ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा प्रसंग ओढवला आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी गावक-यांमधून उमटत होत्या.