पदाधिकाऱ्यांचा कारभार एककल्ली!

By Admin | Published: September 25, 2015 01:25 AM2015-09-25T01:25:49+5:302015-09-25T01:25:49+5:30

पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण, केवळ नावाला सुरू झालेले उपक्रम, आहे

The office bearers of the office! | पदाधिकाऱ्यांचा कारभार एककल्ली!

पदाधिकाऱ्यांचा कारभार एककल्ली!

googlenewsNext

पुणे : पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण, केवळ नावाला सुरू झालेले उपक्रम, आहे त्या शाखा कार्यरत करण्याऐवजी आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून खिरापतीप्रमाणे शाखा वाटणे असे विविध आरोप होऊ लागले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा महिनाअखेरीस होत असून, त्या वेळी या आरोपांमुळे वादाला तोंड फुटून खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुढील वर्षी मार्च महिन्यात साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. साहित्य महामंडळाच्या कारभारीची मुदतही संपत आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील ही वार्षिक सभा अखेरची ठरणार आहे. त्यामुळे ही सभा अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाले. मतदारांनी पूर्ण बहुमताने एकहाती सत्ता दिली. एकजुटीवर कारभार चालेल, असे वाटत असताना अधूनमधून वादाचा ठिणग्या पडू लागल्या. आता तर अशी परिस्थिती आहे, की कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन एकीकडे आणि प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे दुसरीकडे. परिषदेच्या सर्वच कारभारात अंतर्गत राजकारणाने शिरकाव केला आहे.
नव्या कार्यकारिणीने सत्ता हाती घेतल्यानंतर परिषदेचा कारभार बदलण्याची घोषणा केली. बाल-युवा मंच, नाट्य विभाग, कॉफी टेबल, नवे कोरे तसेच बालकुमारांसाठी विशेष अंक, दिवाळी अंक सुरू करण्याची घोषणा केली. नव्या उपक्रमांना सुरुवात झाली; पण उपक्रम ठरले ते केवळ सुरू करण्यापुरते. हे उपक्रम ठेव म्हणून ठेवलेल्या निधीतील व्याजामधून सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. व्याज तर नियमित मिळत आहे; पण हे उपक्रम बंद का पडले, हे मात्र समजण्यापलीकडील आहे.
लहान मुलांसाठी ‘मज्जाच मज्जा’ हा अंक सुरू करण्यात आला; पण अंक सुरू करण्यापूर्वी कार्यकारिणीची मंजुरी घेण्यात आली नाही. सरकारी कार्यालयांमध्ये ज्याप्रमाणे कार्योत्तर परवानगी घेतली जाते, तशी परवानगी यासाठी घेण्यात आली. दिवाळी अंक सुरू केला; पण ज्यांना अनुभव नाही अशांकडे अंकाची जबाबदारी दिली. विक्रीची व्यवस्था नसल्याने बराच अंक रद्दीत पडला आहे. ‘अंक हातोहात खपेल’ ही भावना फोल ठरली आहे.
ज्यांचा साहित्यक्षेत्राशी संबंध नाही, अशा व्यक्ती साहित्य परिषदेशी जोडल्या जाव्यात, यासाठी कॉफी टेबल हा उपक्रम सुरू करण्यात आला; मात्र तोही बंद पडला. ‘नवं कोरं’ हा उपक्रम ओळखीच्या लोकांसाठी राबविला गेला की काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
परिषदेच्या या सावळ्या गोंधळासंदर्भात सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले, तरच परिषदेचा कारभार समाधानकारक होऊ शकतो; अन्यथा परिषदेच्या कारभारला सरकारी कार्यालयाचे स्वरूप आल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: The office bearers of the office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.