मंगरुळपीरमधील अधिकाऱ्यांचा मुख्यालयाला ‘खो’; जनतेच्या कामांचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 03:07 PM2018-04-20T15:07:09+5:302018-04-20T15:07:09+5:30
वास्तव: कर्मचारी वर्गावर नियंत्रणच नाही
मंगरुळपीर: शहरातील विविध विभागाच्या कार्यालयातील चार बडे अधिकारी मुख्यालयी न राहता अपडाऊन करीत आहेत. त्यातील तीन, तर चक्क परजिल्ह्यातून येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार कोण, हा प्रश्न उपस्थित होत असून, यामुळे जनतेच्या कामांचाही खोळंबा होत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुक्यात पाहायला मिळत आहे.
मंगरुळपीर हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी तहसील कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख कार्यालय, नगर परिषद, अशी तालुकास्तरावरील सर्वच मुख्यालये आहेत. या कार्यालयात कार्यरत असलेले काही बडे अधिकारी मुख्यालयी न राहता अपडाऊन करतात. त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असून, संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही नियंत्रण राहत नसल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर येथे नगर परिषदेत गेल्या काही महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या मुख्याधिकारी या अमरावतीहून अपडाऊन करतात. त्यामुळे त्यांची येण्याची वेळ ही बहुधा निश्चित नसते. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पालिकेतील कर्मचाऱ्यांत बेजबाबदारपण वाढण्याची शक्यता आहे. मंगरुळपीर पंचायत समितीमधील मुख्य पदावर अर्थात गटविकास अधिकारी हेसुद्धा मंगरुळपीर येथे राहत नाहीत. ते बाहेरच्या जिल्ह्यातून अपडाऊन करीत आहेत. त्यातच पंचायत समितीमधील शिक्षण विभागातील मुख्य अधिकारी म्हणजेच गटशिक्षणाधिकारीसुद्धा परजिल्ह्यातून अपडाऊन करीत असून, त्यांच्यासह शिक्षण विस्तार अधिकारीसुद्धा दुसºया तालुक्यातून अपडाऊन करीत आहेत. आता बडे अधिकारीच मुख्यालयी राहण्याच्या नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर इतर कर्मचाºयांवर वचक ठेवणार कोण, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
अधिकाऱ्यांकडून भाड्याच्या खोलीचा हवाला
मुख्यालयी न राहता इतर ठिकाणाहून अपडाऊन करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी गटविकास अधिकारी एन. पी. खैरे आणि शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकांत माने यांच्याशी संपर्क साधून वस्तूस्थिती जाणून घेतली असता. आम्ही शहरातच खोली भाड्याने घेऊन राहत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्रत्यक्षात या प्रकरणी बड्या अधिकाऱ्यांनीच चौकशी करून या अधिकाऱ्यांचे वास्तव माहिती करणे आवश्यक आहे. दरम्यान, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नागे यांच्याशी संपर्क साधला असता आपण शासकीय निवासस्थानातच राहतो; परंतु सतत काम सुरू असलेल्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी वारंवार जावे लागत असल्याने निवासस्थान बंदच दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्याधिकारी नॉट रिचेबल
अमरावतीवरून अपडाऊन करणाºया नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या अपडाऊनबाबत माहिती मिळू शकली नाही.