ऑनलाईनऐवजी विद्यार्थ्यांनी सोडविले ऑफलाईन पेपर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 05:00 PM2020-10-20T17:00:52+5:302020-10-20T17:01:07+5:30
Fiasco of Online Exam Washim तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले.
मानोरा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विविध विद्याशाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला ऑनलाईन पद्धतीने २० ऑक्टोबरपासून सुरूवात झाली खरी; परंतू, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना तांत्रिक फटका बसला. मानोरा येथे तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले तर काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने पेपर सोडविले.
यंदा कोरोनामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या परीक्षा कधी होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होते. अमरावती विद्यापिठाच्या विविध विद्याशाखेच्या परीक्षा यापूर्वी १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. तांत्रिक कारणामुळे या परीक्षा २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. मानोरा येथे पहिल्याच दिवशी तांत्रिक कारणामुळे या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. संकेतस्थळावर ह्यलॉग-इनह्ण होत नव्हते. परीक्षेच्या अॅपवर लॉग-इन करताना अनेक अडचणी आल्या. पेपरला सुरूवात होऊन अर्ध्या तासानंतरही तांत्रिक अडचण कायम असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपले महाविद्यालय गाठले आणि तेथे ऑफलाईन पेपर दिला तर काही विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेपासून वंचित राहिले. अंतिम वर्षाच्या परीक्षा व्यवस्थित घेण्यात अमरावती विद्यापिठाचे नियोजन हुकल्याने विद्यार्थ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.
ऑनलाइन परीक्षेत अनेक अडचणी आल्याने वेळेवर विविध विद्याशाखाचे विद्यार्थी कॉलेज आले आणि ऑफलाईन पेपर सोडविला. वेळेवर विद्यार्थी संख्या वाढल्याने बैठक व्यवस्था करणे, पेपर देणे कठीण होत आहे. त्यात मनुष्यबळ नाही. सर्व धांदल उडाली आहे. तरी आम्ही आलेल्या विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्याची व्यवस्था करीत आहो.
- प्रा. भास्कर थेर
परीक्षा विभाग प्रमुख
मा.सु.पा. महाविद्याय, मानोरा