शेतजमिनीचे जुने दस्तऐवज आता एका क्लिकवर
By दिनेश पठाडे | Updated: March 13, 2024 14:15 IST2024-03-13T14:15:00+5:302024-03-13T14:15:17+5:30
वाशिम तालुका भूमिअभिलेख कार्यालय बनले स्मार्ट; किऑस्क मशीन कार्यान्वित

शेतजमिनीचे जुने दस्तऐवज आता एका क्लिकवर
वाशिम : वाशिम तालुका भूमिअभिलेख कार्यालयात स्मार्ट प्रकल्पांतर्गत किऑस्क मशीन बसविण्यात आली आहे. शेत आणि जमिनीविषयक विविध प्रकारचे १८ दस्तऐवज आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत.
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेले तालुका उपधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय अद्ययावत करण्याचा निर्णय घेऊन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख विभागाने राज्यस्तरावर ३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार वाशिम तालुका कार्यालयासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, आवश्यक कामे हाती घेण्यात आली. उपअधीक्षक अभिलेख कार्यालयाच्या ठिकाणी जनतेच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा या कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिवाय कार्यालय इमारतीत बदल करून विविध कक्ष नव्याने बनविण्यात आले आहेत. नागरिकांसाठी अभ्यागत कक्ष निर्माण करण्यात आला असून, स्वागत कक्षातच माहिती उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात जिल्हा मुख्यालयी असलेल्या तालुका उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय स्मार्ट बनविले जात असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तालुका कार्यालये स्मार्ट बनविली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख शिवाजीराव भोसले यांनी दिली.
काय आहे भू-प्रणाम संकल्पना?
तालुका भूमिअभिलेख कार्यालयाच्या ठिकाणी जनतेच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या हेतूने जुनाट, कोंदट व भौतिक सुविधा नसलेले कार्यालय राज्याच्या जमाबंदी आयुक्तांच्या भू-प्रणामच्या अभिनव संकल्पनेतून स्मार्ट कार्यालय बनले आहेत. त्याअंतर्गत संपूर्ण कार्यालयाची रंगरंगोटी करून आधुनिक प्रकाशयोजना केली आहे. कार्यालयातील अनावश्यक भिंती पाडून कार्यालय हवेशीर व प्रशस्त बनविले आहे. स्वागत कक्ष, अभ्यागतांसाठी अभ्यागत कक्ष, वॉटर फिल्टर, सीसीटीव्ही, नोटीस बोर्ड, स्वच्छतागृह, अधिकारी, कर्मचाऱ्यांना लॅपटॉप आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.