वाशिममधील अडाण धरणाच्या पाण्यात बुडून वृद्धाचा मृत्यू
By सुनील काकडे | Published: July 8, 2023 05:15 PM2023-07-08T17:15:51+5:302023-07-08T17:19:26+5:30
म्हसणी येथील रहिवासी बळीराम वरघट हे मोलमजूरी करून अडाण धरणात मासे पकडण्याचे काम करित होते.
वाशिम : मानोरा तालुक्यातील म्हसणी येथील बळीराम दौलत वरघट (६०) यांचा तोरनाळा शिवारातील अडाण धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ जुलै रोजी उघडकीस आली. पोलिस पाटील हरिदास राऊत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
म्हसणी येथील रहिवासी बळीराम वरघट हे मोलमजूरी करून अडाण धरणात मासे पकडण्याचे काम करित होते. ७ जुलै रोजी अडाण धरणात मासेमारीकरिता गेले; मात्र ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटूंबियांनी धरणावर पाहणी केली. यादरम्यान बळीराम यांचा मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्यात पाय अडकून मृत्यू झाल्याचे ८ जुलै रोजी निदर्शनास आले.
माहिती मिळताच मानोरा पोलिस स्टेशनचे बीट जमादार सुभाष महाजन, रवींद्र राजगुरे, शंकर राख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच बळीराम वरघट यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याकामी इंझोरी ‘सास’चे हेड अजय ढोक यांच्यासह स्वप्निल वरघट, शुभम वरघट, रोशन वरघट व धम्मा अंभोरे यांनी प्रत्यक्ष मदतकार्य केले. मानोरा येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.