गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ११३ जण तडीपार; प्रशासन अलर्ट मोडवर!
By संतोष वानखडे | Published: September 27, 2023 12:58 PM2023-09-27T12:58:43+5:302023-09-27T12:58:47+5:30
३० सप्टेंबर रोजी ईदची मिरवणूक असल्याने त्या दिवशी ३४ लोकांना २९ सप्टेंबरच्या रात्रीपासून ते १ ऑक्टोंबरच्या सकाळपर्यंत तडीपार करण्यात आले.
वाशिम : गणेश विसर्जन मिरवणूक व ईदची मिरवणूक लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ११३ जणांवर रिसोड पोलिस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आले.
रिसोड शहरात २८ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. त्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ६९ जणांना २७ सप्टेंबरच्या रात्रीपासून ते २९ सप्टेंबरचे सकाळपर्यंत रिसोड पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आले. ग्रामीण भागात २९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने त्या दिवशी ग्रामीण भागातील ९ लोकांना तडीपार करण्यात आले. तसेच ३० सप्टेंबर रोजी ईदची मिरवणूक असल्याने त्या दिवशी ३४ लोकांना २९ सप्टेंबरच्या रात्रीपासून ते १ ऑक्टोंबरच्या सकाळपर्यंत तडीपार करण्यात आले. यासंदर्भातील आदेश संबंधित व्यक्तींना बजावण्यात आले. तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तींबाबत कोणाला माहिती मिळाल्यास याबाबतची कल्पना पोलिसांना देण्यात यावी असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.
विशेष पथकाचा वाॅच
या तडीपार व्यक्तींपैकी कोणी रिसोड पोलीस स्टेशन हद्दीत मिळून आल्यास त्याच्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. तडीपार करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींचे छायाचित्र सर्व पोलिस अंमलदारांना देण्यात आले असून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक पोलीस अधिकारी व पाच अंमलदारांची नेमणूक करण्यात आली.