अखेरच्या दिवशी केवळ ९ जणांचे प्रवेश, निवड झालेले २५४ विद्यार्थी मोफत शिक्षणास मुकले
By दिनेश पठाडे | Published: May 23, 2023 01:22 PM2023-05-23T13:22:06+5:302023-05-23T13:23:24+5:30
आरटीई अंतर्गत खासगी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिला जातो.
वाशिम : आरटीई अंतर्गत खासगी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी निवडलेल्या ७७५ पैकी ५२१ जणांचे प्रवेश निश्चित झाले. सोमवारी (दि.२२) अखेरच्या दिवशी केवळ ९ जणांचे प्रवेश झाले.
शैक्षणिक वर्षे २०२३-२४ साठी आरटीई अंतर्गत एप्रिल महिन्याच्या १३ तारखेपासून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश घेण्यास अडथळा निर्माण झाल्याने वारंवार मुदतवाढ देण्यात आली. २२ मे पर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती. यामुदतीत अधिकाधिक प्रवेश होतील अशी अपेक्षा होती.
मात्र त्यानंतरही २५४ जणांचे प्रवेश बाकी होते. प्रवेशासाठी नव्याने मुदतवाढीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पोर्टलवर दिसून आले. मनासारखी शाळा न मिळणे, घरापासून शाळेचे अंतर जास्त असणे अशा विविध कारणांमुळे काही पालकांनी निवड होऊनही पाल्यांचा प्रवेश घेतला नसल्याचे दिसून येते. यंदाही निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नसल्यामुळे रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश पूर्ण क्षमतेने होतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, रविवार(दि.२१) पर्यंत आरटीई अंतर्गत ५१२ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते, त्यानंतर अखेरच्या दिवशी अर्थात सोमवारी ९ प्रवेशांची भर पडली.