सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाशिममध्ये शोभायात्रेचे आयोजन, तरूणाईत दिसला उत्साह

By संतोष वानखडे | Published: January 3, 2024 06:34 PM2024-01-03T18:34:29+5:302024-01-03T18:34:39+5:30

वाशिम शहरातून शोभायात्रा काढण्यात आली

On the occasion of Savitribai Phule Jayanti, a procession was organized in Washim, enthusiasm was seen in the youth. | सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाशिममध्ये शोभायात्रेचे आयोजन, तरूणाईत दिसला उत्साह

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाशिममध्ये शोभायात्रेचे आयोजन, तरूणाईत दिसला उत्साह

संतोष वानखडे, वाशिम: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती महोत्सवानिमित्त ३ जानेवारी रोजी वाशिम शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक चौकातून या शोभायात्रेला सुरूवात झाली. शहरातील देवपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, काटीवेश, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक, गणेश पेठ, दंडे चौक, चंडिकावेस येथून पुन्हा क्रांतीसुर्य महात्मा फुले स्मारक चौक येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेदरम्यान विविध पोवाडे आणि क्रांतीगीतांनी संपूर्ण शहर सावित्रीबाईमय झाल्याचे दिसून आले. शोभायात्रेत शहर व परिसरातील महिला, पुरुष, युवक, युवती, शालेय विद्यार्थिनी, विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व इतर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी घेतला होता. शोभायात्रेच्या यशस्वितेसाठी सार्वजनिक सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीच्यावतीने परिश्रम घेण्यात आले.

सावित्रीबाईंच्या वेशभूषा साकारल्या
 

शोभायात्रेच्या समोर असणाऱ्या रथात सावित्रीबाईंची वेशभूषा केलेल्या महिला, युवती आणि चिमुकल्या मुली विराजमान होत्या. या रथाने आणि सावित्रीबाईंच्या वेशभूषा साकारलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बक्षिसांचे वितरण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त २५ डिसेंबर रोजी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शोभायात्रेच्या प्रारंभी बक्षीस वितरण करण्यात आले.

लेझिम नृत्य, लाठीकाठी प्रात्यक्षिक
 

शोभायात्रेदरम्यान छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ व बालासाहेब क्रीडा मंडळाच्या लेझिम पथकाने लेझिम नृत्य सादर केले. तसेच सावित्रीच्या लेकिंनी लाठीकाठी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

पथनाट्याचे सादरीकरण

शोभायात्रेत महिलांचे भजनी मंडळ, शाहीरी पोवाडे, पथनाट्य सादरीकरण झाले. शाहीर उत्तम इंगोले, शाहीर संतोष खडसे, शाहीर दुर्गाबाइ इंगोले, शाहीर सुनिता रणवीर, ढोलकपटू सुनील लबडे आदींनी पोवाडे, पथनाट्य सादर केले.

Web Title: On the occasion of Savitribai Phule Jayanti, a procession was organized in Washim, enthusiasm was seen in the youth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम