५ महिन्यांत ५८४ तक्रारींचा ‘ऑन दी स्पाॅट’ निपटारा, शिबीरांची फलश्रृती
By सुनील काकडे | Published: October 21, 2023 03:09 PM2023-10-21T15:09:40+5:302023-10-21T15:10:11+5:30
पोलिस-जनता सलोखा कार्यक्रम
सुनील काकडे
वाशिम : नागरिक आणि पोलिसांमध्ये सुसंवाद कायम राहावा, त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून त्या सोडविता याव्या. यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी पोलिस प्रशासन सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्यानुषंगाने गत ५ महिन्यांमध्ये पोलिस दलाने चार विशेष शिबीरे घेवून ५८४ नागरिकांच्या तक्रारींचा ‘ऑन दी स्पाॅट’ निपटारा केला. अशाप्रकारे तत्काळ न्याय मिळत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
अन्यायग्रस्त नागरिकांना तक्रार निवारणासाठी पोलिस स्टेशनमध्ये सतत चकरा माराव्या लागू नये, त्यांच्या समस्यांवर तोडगा काढून तक्रारींचे विनाविलंब निवारण व्हावे, या हेतूने शिबीरांची संकल्पना पुढे आली. त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.
याअंतर्गत चालूवर्षी ५ जून रोजीला आयोजित शिबिरात २३१, २५ जुलै रोजी ८४, २६ ऑगस्टला २१३ आणि तीन दिवसांपूर्वी, १८ ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या शिबिरातून ५६ अशा एकंदरित ५८४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या.
पोलिसांवरील ताणही तुलनेने झाला कमी
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये आणि पोलिस स्टेशन स्तरावर विविध स्वरूपातील तक्रारी प्रलंबित राहतात. त्या निकाली काढण्यासाठी तक्रारदारांकडून तगादा लावला जातो. मात्र, आता प्रत्येक महिन्यांत शिबीर घेवून तक्रारी निकाली निघत असल्याने तक्रारदारांचे समाधान होण्यासोबतच पोलिसांवरील ताणही तुलनेने कमी झाला आहे.
नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, अडचणींच्या निवारणासाठी स्थानिक पोलिस स्टेशनला भेट द्यावी. तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे.
- बच्चन सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम