महामार्गाच्या कडेला ओंडक्याचे ढीग, अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:40 AM2021-03-21T04:40:24+5:302021-03-21T04:40:24+5:30
अकाेल्यापासून वाशिम जिल्ह्यात चाैपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट गुजरातच्या माेंटाे कार्लाे कंपनीने घेतले आहे. त्यांचे कार्यालय ही मालेगाव नजीक आहे. सदर ...
अकाेल्यापासून वाशिम जिल्ह्यात चाैपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट गुजरातच्या माेंटाे कार्लाे कंपनीने घेतले आहे. त्यांचे कार्यालय ही मालेगाव नजीक आहे. सदर कंपनीने रस्त्याच्या चाैपदरीकरणासाठी महामार्गाच्या दुतर्फा इंग्रज काळातील लावण्यात आलेले लिंबाचे वृक्ष ताेडण्याची माेहीम हाती घेतली आहे. ताेडलेल्या वृक्षांचा मलबा रस्त्याच्या दुतर्फा पडून असल्यामुळे अपघातांमध्ये कमालीची वाढ झालेली असताना संबंधितांकडून काेणतीच उपाययाेजना अद्याप करण्यात आली नाही. रस्त्याच्या कडेला टाकून ठेवण्यात आलेले लाकडाचे ओंडके रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दिसून येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. दरराेज या मार्गावर किरकाेळ स्वरुपाचे अपघात माेठ्या प्रमाणात हाेत असताना संबंधित कंपनी माेठ्या अपघाताची प्रतीक्षा करीत आहे का असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. विशेष म्हणजे या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय वाशिम यांच्याकडे देखरेखीची जबाबदारी साेपविण्यात आली असताना त्यांच्याकडूनही काेणतीच दखल घेण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गावातील काही नागरिक रात्रीच्या वेळी ही लाकडे चाेरुनही नेत असल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर ना कंपनी ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील अधिकारी यांना काही देणे घेणे दिसून येत नाही. सदर कंपनीच्या वेळकाढू धाेरणामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. यासंदर्भात माेंटाे कार्लाे कंपनीचे श्याम ताेमर यांच्याशी या विषयावर संपर्क साधला असता त्यांनी आपण ८ महिन्यापूर्वीच कंपनी साेडून दिल्याचे सांगितले असून सध्या सिनिअर मॅनेजर म्हणून राजू तिवारी काम पाहत असल्याची माहिती दिली. परंतु त्यांच्याशी संपर्क हाेऊ शकला नाही. तरी या कामावर देखरेख असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाने लक्ष देऊन यावर उपाययाेजना करण्याची मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.