दगडफेकप्रकरणी एका आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:18 AM2017-08-04T01:18:52+5:302017-08-04T01:20:07+5:30
वाशिम: शहरातील शुक्रवार पेठेतील विठ्ठल मंदिर राजगुरू गल्लीत बुधवारी रात्री दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत एका आरोपीस अटक केली असून, ३0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी तीन पथकांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शहरातील शुक्रवार पेठेतील विठ्ठल मंदिर राजगुरू गल्लीत बुधवारी रात्री दोन गटात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत एका आरोपीस अटक केली असून, ३0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी तीन पथकांसह पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
वाशिम येथील शुक्रवारपेठ भागात विठ्ठल मंदिराजवळ दोन गटात वाद होऊन बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीत २ जण जखमी झाले असून, ५ दुचाकी वाहन व एक चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. सदर घटनेची फिर्याद प्रवीण सुरेश खुळे यांनी दिली. या फिर्यादीनुसार वाशिम शहर पोलिसांनी शेख आजीम शेख सरू यास अटक केली तर अन्य २५ ते ३0 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. सदर घटनेमध्ये मोठय़ा प्रमाणात दुचाकी व चारचाकीचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमध्ये संदीप व्यवहारे, प्रवीण ढवळे हे दोन जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहेत. सदर घटनेनंतर पोलिसांनी गुरुवारी तोडफोड झालेल्या दुचाकी व चारचाकी गाड्यांचा पंचनामा करण्यात आला आहे. या परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवून परिस्थिती आटोक्यात ठेवण्यात यश मिळविले. जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक स्वप्ना गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण धात्रक, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पाटकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे किरण साळवे आदी पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस दल परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्वत्र शांतता राहावी यासाठी पोलीस दल कटिबद्ध असून, कुणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही तसेच कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहराचे वातावरण बिघडविण्याचे काम करू नये, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही.
- मोक्षदा पाटील
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम