तीनच दिवसांत कृषिपंपांची एक कोटीची थकबाकी वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:27+5:302021-03-15T04:37:27+5:30
जिल्ह्यात कृषिपंपधारक शेतकऱ्यांची संख्या ६१ हजार ६९६ असून ६ हजार ८६१ विद्युत रोहित्रांमधून संबंधितांच्या कृषिपंपांना विद्युत पुरवठा केला जातो. ...
जिल्ह्यात कृषिपंपधारक शेतकऱ्यांची संख्या ६१ हजार ६९६ असून ६ हजार ८६१ विद्युत रोहित्रांमधून संबंधितांच्या कृषिपंपांना विद्युत पुरवठा केला जातो. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी कृषिपंपांच्या विद्युत देयकांची थकबाकी होती. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वसुलीला २ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगिती दिली. मात्र, १० मार्च रोजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थगिती हटवून देयक वसुलीच्या मोहिमेस गती देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातही महावितरणच्या पथकाने वसुली मोहीम अधिक तीव्र केली असून गावोगावच्या थेट रोहित्रांमधून कृषिपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामुळे विशेषत: फळबाग आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
.........................
बॉक्स :
देयक भरल्यास तात्काळ वीजपुरवठा सुरळीत
कृषिपंपांच्या प्रत्येक रोहित्रांमधून १० ते १२ शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे. रक्कम थकीत असल्याने सर्वच जोडण्या तोडण्यात येत आहेत. दरम्यान, त्यातील जे शेतकरी देयक अदा करीत आहेत, त्यांचा वीजपुरवठा तत्काळ सुरळीत केला जात असल्याचे दिसून येत आहे.
...............
कोट :
जिल्ह्यातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे ६५० कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. शासनाच्या आदेशावरून वसुली मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत १ कोटी रुपये वसूल झाले. देयक अदा करणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा विनाविलंब सुरळीत करून दिला जात आहे.
- आर. जी. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम.