आठवड्यातील एक दिवस स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 05:47 PM2018-10-15T17:47:03+5:302018-10-15T17:47:26+5:30
वाशिम - स्पर्धेच्या युगात विद्यार्थी मागे राहू नये म्हणून वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयाने गत पाच वर्षांपासून आठवड्यातील एक दिवस ‘जनरल नॉलेज : स्टुडन्ट आॅफ दी वीक’ हा उपक्रम हाती घेतलेला आहे.
- संतोष वानखडे
वाशिम - स्पर्धेच्या युगात विद्यार्थी मागे राहू नये म्हणून वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयाने गत पाच वर्षांपासून आठवड्यातील एक दिवस ‘जनरल नॉलेज : स्टुडन्ट आॅफ दी वीक’ हा उपक्रम हाती घेतलेला आहे. दर गुरूवारी सूचना फलकावर १० प्रश्न देऊन उत्तरे शोधून आणणाºया विद्यार्थ्याला शिक्षकाकडून स्पर्धा परीक्षेची पुस्तकेही मोफत दिली जातात.
स्पर्धेच्या युगात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नये म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहे. असाच एक उपक्रम पार्डी टकमोर येथील पारेश्वर विद्यालयात गणित शिक्षक हरीष चौधरी यांनी हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने इतर व्यावहारीक ज्ञान मिळावे, स्पर्धा परीक्षेची माहिती बालवयातच मिळावी यासाठी गत पाच वर्षांपासून ‘जनरल नॉलेज : स्टुडन्ट आॅफ दी वीक’ हा उपक्रम राबविण्यात येतो.यामध्ये आठवड्यातील दर गुरुवारला १० प्रश्न सुचना फलकावर लावण्यात येतात. या प्रश्नांची उत्तरे सहा दिवसात शोधावी लागतात. उत्तरे शोधताना विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची अनेक पुस्तके हाताळतात. यामधून विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीपासूनच स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण होते. या उपक्रमात जवळपास ४५० ते ५०० विद्यार्थी सहभागी होतात. यामधून एक विजेता ठरविला जातो व त्याला स्पर्धा परीक्षेचे २०० ते ३०० रुपये किंमतीचे पुस्तक मोफत दिले जाते. वर्षभरात जो जास्तीत जास्त वेळा विजेता ठरेल त्याला दोन हजार रुपयांचे पारीतोषिकही २६ जानेवारीला मान्यवरांचे हस्ते देण्यात येते. या उपक्रमाचे जनक हरीष चौधरी यांना संस्थाध्यक्ष रामभाऊ चौधरी, सचिव केशवराव चौधरी, सेवानिवृत्त प्राचार्य सोपानराव कांबळे, प्राचार्य बाबाराव राठोड, रामेश्वर ढोबळे व बंडु वाघमारे यांच्यासह अन्य शिक्षकांचेही सहकार्य लाभत आहे. परिसरात या उपक्रमाचे कौतूक होत आहे.