एक हेक्टर शेतात पिकविला ४६ क्विंटल गहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:45+5:302021-07-04T04:27:45+5:30
मानोरा तालुक्यात सिंचनाची पुरेशी सुविधा अद्यापपर्यंत उभी झालेली नाही. असे असतानाही तालुक्यातील काही प्रगतिशील आणि ध्येयवेड्या शेतकऱ्यांनी समस्येचा बागुलबुवा ...
मानोरा तालुक्यात सिंचनाची पुरेशी सुविधा अद्यापपर्यंत उभी झालेली नाही. असे असतानाही तालुक्यातील काही प्रगतिशील आणि ध्येयवेड्या शेतकऱ्यांनी समस्येचा बागुलबुवा न करता उपलब्ध सुविधांमध्येच शेतीला कष्टासोबत आधुनिकता व तंत्रज्ञानाची जोड देत विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. त्यातीलच एक शेतकरी म्हणजे शांताबाई सरोदे. त्यांनी २०२०-२१ मधील रब्बी हंगामात एक हेक्टर शेतातून तब्बल ४६ क्विंटल गव्हाचे विक्रमी उत्पन्न घेतले. त्यांच्या या प्रयोगशीलतेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून सन्मानपत्र देऊन त्यांचा यथोचित गाैरव करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १ जुलै रोजी तालुका कृषी अधिकारी किशोर सोनटक्के यांनी आसोला येथे शांताबाईंच्या घरी जाऊन त्यांच्याकडे शासनस्तरावरून पाठविण्यात आलेले सन्मानपत्र सुपूर्द केले.
.....................
सुयोग्य नियोजनातून साधली समृद्धी
शेतजमिनीवरील पिकांवर रासायनिक औषधींचा वापर मर्यादित स्वरूपात करण्यासह पाण्याचे सुयोग्य नियोजन केले. त्यामुळेच एक हेक्टर क्षेत्रात गव्हाचे ४६ क्विंटल उत्पादन घेणे शक्य झाले, अशी माहिती महिला शेतकरी शांताबाई सरोदे यांनी दिली.