काेरोना हॉटस्पॉट ठरलेल्या गोवर्धन गावात शंभर टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:44+5:302021-06-30T04:26:44+5:30
तालुक्यातील गोवर्धन हे गाव कोरोना या आजाराचे हॉटस्पॉट ठरले होते. या गावात जवळपास पाचशे ते सहाशे नागरिकांना कोरोना संसर्गाची ...
तालुक्यातील गोवर्धन हे गाव कोरोना या आजाराचे हॉटस्पॉट ठरले होते. या गावात जवळपास पाचशे ते सहाशे नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. त्यामुळे गावात भीतीयुक्त वातावरण तयार झाले. गावातील अनेक जणांचे नातेवाईक आई-वडील, भाऊ-बहीण या आजारामुळे मृत्यू पावले होते. त्यामुळे गावात जाण्यासाठी नातेवाईकही घाबरत होते. ही गंभीर स्थिती निर्माण झाल्यानंतरही ग्रामस्थांनी या महामारीला न घाबरता हिमतीने सामना करीत प्रशासनाला सहकार्य केले, तर आरोग्य विभागानेही व्यापक उपाययोजना करतानाच कोरोना नियंत्रणासाठी समता फाउंडेशनच्या माध्यमातून लसीकरण मोहीम सुरू केली. अवघ्या तीनच दिवसांत या गावांतील शंभर टक्के लोकांनी लस घेतली.
--------------------
समता फाउंडेशनला ग्रामस्थांचे सहकार्य
गोवर्धन गावात लसीकरण मोहिमेसाठी स्वतः समता फाउंडेशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम अग्रवाल यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. ही मोहीम राबविण्यासाठी ग्रामपंचायत गोवर्धन, अंगणवाडी सेविका, उत्साही तरुण मंडळ गोवर्धन, आशा वर्कर, पटवारी, ग्रामसेवक, संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, गावातील संपूर्ण सामाजिक कार्यकर्ते यांनी सहकार्य करून समता फाउंडेशनचे आभार मानले.