‘एक व्यक्ती-एक वृक्ष’ उपक्रम साकारला
By admin | Published: July 7, 2017 01:21 AM2017-07-07T01:21:50+5:302017-07-07T01:21:50+5:30
वाशिम : चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत ६ जुलै रोजी भामदेवी (ता. कारंजा) येथे लोकसहभागातून दोन हजार वृक्षांची लागवड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सुरु असलेल्या वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत ६ जुलै रोजी भामदेवी (ता. कारंजा) येथे लोकसहभागातून दोन हजार वृक्षांची लागवड केली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या प्रेरणेतून गतवर्षीही भामदेवी येथील ग्रामस्थांनी ‘एक व्यक्ती, एक वृक्ष’ याप्रमाणे दोन हजार ५०० वृक्षांची लागवड केली होती.
वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीसुद्धा सहभागी झाले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मिळालेल्या दोन कोटी रुपये निधीतून भामदेवी येथे विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत. यामध्ये शेततळे, नाला खोलीकरण, सलग समतल चर यासारख्या जलसंधारणाच्या कामांचाही समावेश आहे. गतवर्षी या ठिकाणी शासकीय मालकीच्या साडेसहा हेक्टर जमिनीवर समतल चर खोदण्यात आले होते. वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान या परिसरात गावातील प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवून आपल्या नावाचे झाड स्वत:च्या हाताने लावण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. भामदेवीच्या ग्रामस्थांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेऊन प्रत्येकी एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा केली. गाव वनयुक्त बनविण्याचा निर्धार केला. यावर्षीसुद्धा वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचा भामदेवी येथील ग्रामस्थांनी निश्चय केला. त्यानुसार गावामध्ये १८ हेक्टर क्षेत्रावर खोदण्यात आलेल्या सलग समतल चर परिसरात २० मे २०१७ रोजी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या उपस्थितीमध्ये लोकसहभागातून खड्डे खोदले होते. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुमारे २ हजार रोपे पुरविण्यात आली. यामध्ये जांभूळ, सीताफळ, आवळा, सिसम, कडूनिंब आदी प्रजातींचा समावेश आहे. या रोपांची ६ जुलैला लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवड कार्यक्रमात ग्रामस्थ, जिल्हाधिकाऱ्यांसह शासकीय अधिकारीही सहभागी झाले होते. सलग दुसऱ्या वर्षी भामदेवी यथील ग्रामस्थांनी वृक्ष लागवडमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन गाव वनयुक्त बनविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे.