सततच्या पावसाने एक हजार हेक्टरवरील सोयाबीन बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:35 AM2020-08-26T11:35:53+5:302020-08-26T11:36:00+5:30
पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव वाढला, तर लिपस्पॉट, स्टेमरॉट, या बुरशीजन्य रोगांस पाने व शेंगावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात सततचे ढगाळ वातावरण व पाऊस पडल्याने शेतात पाणी साचले. त्याचा परिणाम सोयाबीनच्या पिकावर झाला. त्यामुळे एक हजाराहून अधिक हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पिक बाधित झाले आहे. पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव वाढला, तर लिपस्पॉट, स्टेमरॉट, या बुरशीजन्य रोगांस पाने व शेंगावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात यंदा ४ लाख ६ हजार ४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन असताना ३ लाख ९३ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होऊ शकली आहे. त्यात सोयाबीन पेरणी ३ लाख ४१७ हेक्टरवर अपेक्षीत असताना २ लाख ९२ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. अर्थात जिल्ह्यात एकूण खरीप क्षेत्राच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र ७५ टक्क्यांहून अधिक आहे. शेतकरी या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहतात. त्यात यंदा निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकºयांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतरच्या पोषक वातावरणामुळे हे पीक बहरले; परंतु या पिकाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या स्थितीत असतानाच जिल्ह्यात १० आॅगस्टपासून सतत ढगाळ वातावरण व पाऊस पडू लागला. त्यामुळे सूर्यप्रकाशाअभावी पानांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा निर्माण झाली. जमिनीत पाणी व हवा याचे विषम प्रमाण झाले. मूळांची शोषणक्रिया बंद पडली आणि पिकावर पांढºया माशीचा प्रादूर्भाव वाढला, तर लिपस्पॉट, स्टेमरॉट, या बुरशीजन्य रोगांस पाने व शेंगावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झाला, तसेच जमिनीत असणाºया विषाणूला पोषक वातावरण मिळाल्याने पाने पिवळी पडू लागली. जमिनीत असणाले शिष्ट, निमॅटोडसमुळे पिकास अन्नद्रव्य शोषूण घेण्यात अडचणी निर्माण होऊन पाने पिवळी पडली आहेत. जिल्ह्यात एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात सततचे ढगाळ वातावरण आणि पावसामुळे सोयाबीन पीक बाधित झाले आहे. त्यात प्रामुख्याने रिसोड तालुक्यात २३०, मालेगाव तालुक्यात २५०, वाशिम तालुक्यात १८०, तर मंगरुळपीर तालुक्यात १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
बीज प्रक्रिया, बीबीएफ पेरणी, पाणी न साचणाºया जमिनीत प्रादूर्भाव नाही
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पीक पिवळे पडून शेतकºयांचे नुकसान झाले आहे. तथापि, ज्या शेतकºयांनी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया केली, अशा ठिकाणी, तसेच पाणी न साचणाºया जमिनीत आणि बीबीएफ यंत्राने केलेल्या पेरणीच्या क्षेत्रात सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा सोयाबीनच्या पिकावर कोणताही विपरित परिणाम झाला नसून, या अशा ठिकाणच्या सोयाबीन पिकाची स्थिती उत्तम आहे, हे विशेष.
ज्या शेतकºयांच्या शेतात पाणी साचल्याने पीक पिवळे पडले, त्या भागांत पाहणी करून मार्गदर्शन करण्याच्या सुचना देण्यात येतील. तथापि, पूर्णपणे पिवळे पडलेल्या आणि बुरशीमुळे मूळा कुजलेल्या क्षेत्रातील सोयाबीन पिकाची स्थिती सुधारणे अशक्य आहे.
-एस. एम. तोटावार,
जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, वाशिम