एकमेका साह्य करणारा अंधाचा ‘चेतन सेवांकुर’ गृप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:23 PM2017-10-14T13:23:58+5:302017-10-14T13:25:46+5:30
वाशिम : तालुक्यातील केकतउमरा येथे एकमेकांना साहय करुन आपला उदरनिर्वाह करणारा अंधांचा गृप वास्तव्यास असून ते स्वत: आपला उदरनिर्वाह आपल्या कलाकौशल्यातून करीत आहेत. उद्या १५ आॅक्टोंबर रोजी जागतिक अंध सहाय्यता दिन असून याहीवर्षी त्यांच्यावतिने ‘अंधातर्फे अंधाना रेडिओ’ वाटपाचा कार्यक्रमाचो आयोजन केले आहे.
केकतउमरा येथील पांडुरंग उचितकर यांचा मुलगा चेतन उचितकर जन्मता अंध आहे. परंतु त्याच्यामध्ये असलेल्या गुणामुळे तो महाराष्टÑासह आंध्रप्रदेश, गोवा येथेही प्रसिध्द आहे. जिल्हयात व नजिकच्या जिल्हयातील काही अंधांचा गृप चेतनने तयार करुन विविध उपक्रम राबवून आपल्या गृपचा उदरनिर्वाह करतांना दिसून येत आहे. या कामी त्यांना पांडुरंग उचितकर व त्यांच्या पत्नी गंगासागर उचितकर यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या सर्व अंधानी मिळून चेतन सेवांकुर आर्केष्टा तयार केला. या माध्यमातून ते लग्न समारंभ, शासनाच्या योजनांची माहिती यासह विविध छोटे मोठे कार्यक्रम घेवून ते त्यामधून मिळत असलेल्या मिळकतीमधून आपला उदरनिर्वाह करतांना दिसून येत आहेत.
रेडिओ वाटपाचा कार्यक्रम
जीवनात एकमेकाशी संपर्क साधण्याचे, भावना व्यक्त करण्याचे मन जाणून घेण्याचे साधन म्हणजे शब्द, आवाज. अंध बांधवांचे तर जग जाणुन घेण्याचं हे प्रमुख साधन म्हणून रेडिओ म्हणजे अंधांचा मित्र सखा. अंधांच्या जिवनातील रेडिओचे महत्व तर केवळ अंधच जाणू शकतो. अनेक बांधवांकडे हा रेडिओ सुध्दा उपलब्ध नसतो याची दखल घेवून अंधातर्फे अंधांना रेडिओ वाटप कार्यक्रमाचे १५ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता चेतन सेवांकुर निवास केकतउमरा येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहरातील अनेक प्रतिष्ठीत मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अंध चेतन, कैलास, प्रविण, निलेश, अमोल, संदिप, लक्ष्मी, रुपाली, कोमल व चेतन सेवांकुर परिवाराचयवतिने करण्यात आले आहे.