महावितरणने एक खिडकी योजना राबविण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:43 PM2017-08-17T13:43:41+5:302017-08-17T13:43:41+5:30
वाशिम - आगामी गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर महावितरणने एक खिडकी योजना राबवून तातडीने गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना केल्या.
आगामी ‘गणेशोत्सव व बकरी ईद’च्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बुधवारी सायंकाळी प्रशासकीय आढावा घेतला. सण, उत्सव साजरे करताना सर्व समाजबांधवांनी प्रशासनाला सहकार्य करावे. या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील सर्व मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या उत्सव मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच सर्व मंडळांनी महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात अधिकृत वीज जोडणी घ्यावी. यासाठी महावितरणने एक खिडकी योजना राबवून मंडळांना त्वरित वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना द्विवेदी यांनी दिल्या.
२५ आॅगस्ट पासून सुरु होत असलेला गणेशोत्सव व या दरम्यान येणारी बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सवोर्तोपरी सज्ज आहे. सर्व समाजातील नागरिकांनीही हे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. गणेशोत्सव काळात डॉल्बीच्या वापरावर बंदी असून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. उत्सव काळात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी यावेळी सांगितले.