कांदा पिकाने आणली शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:19 AM2021-03-04T05:19:17+5:302021-03-04T05:19:17+5:30
मानोरा- (जगदीश राठोड) तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या उमरी सामकी माता या गावातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन ...
मानोरा- (जगदीश राठोड)
तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या उमरी सामकी माता या गावातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन मागील अनेक वर्षांपासून भाजीपाला पिकाला प्राधान्य दिल्याने या गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात बऱ्यापैकी समृद्धी झाल्याचे कांद्याची शेती पाहून लक्षात येते.
मानोरा तालुक्यात ओलिताचे प्रमाण कमी असून आपापल्या शेतीतील सिंचन विहिरींच्या माध्यमाने उमरी बु., फूलउमरी, पोहरादेवी, शेंदोना या भागातील शेतकरी पारंपरिक सोयाबीन, कपाशी, तूर या बेभरवशाच्या पिकाला फाटा देऊन नगदी असलेले भाजीपाला वर्गातील कांदा, वांगी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून घेत आहेत.
उंबरी बु. या एकाच गावात रबी हंगामात जवळपास १०० एकरापर्यंत शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली असून प्रतिएकरी ५० क्विंटल कांदा पिकत असल्याचे शेतकरी शेखर राठोड यांनी सांगितले. कांदा या पिकाव्यतिरिक्त कांदा पिकाच्या बियाणांसाठी म्हणून वापरात येणाऱ्या कांद्याची लागवड ही अनेक शेतकऱ्यांनी या भागात केली आहे. ३५ ते ४० हजार रुपये क्विंटल कांदा पिकाच्या बियाणाला दर मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.