भाव गडगडल्याने नदीत फेकून दिला कांदा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:35 PM2020-07-16T12:35:30+5:302020-07-16T12:35:36+5:30
शिवणी येथील श्यामराव राजाराम कुटे नामक शेतकºयाने तर १५ जुलै रोजी भोपालपेंड नदीपात्रात कांदे फेकून दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव : नेहमीच या ना त्या संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांसमोर, आता कांद्याचे भाव गडगडल्याने नवे संकट उभे ठाकले आहे. अत्यल्प भाव मिळत असल्याने आसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हताश झाले असून, शिवणी येथील श्यामराव राजाराम कुटे नामक शेतकºयाने तर १५ जुलै रोजी भोपालपेंड नदीपात्रात कांदे फेकून दिले.
लॉकडाऊनमुळे आसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, जवळच्या विविध ठिकाणच्या नामांकित बाजारपेठा बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांची फरफट होत आहे. अमरावती, यवतमाळ याठिकाणी जाणारा कांदा लॉकडाऊनमुळे नेण्यात अडचणी होत्या. पाच महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव २१०० रुपये क्विंटल होते; ते आता ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल आले आहेत. कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. २०१९ मध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे शेती उत्पादीत मालाला भाव नाही आणि त्यात कांद्याचे भाव एकदम गडगडले अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. साधारणत: एक एकर कांदा पिकासाठी मशागत खर्च किमान पाच हजार रुपये, रोप पाच हजार रुपये, लागवड सात हजार रुपये, फवारणी दोन हजार रुपये, खुरपणी एक हजार रुपये, काढणी ९५०० रुपये, कांदा गोणी ३० रुपये, वाहन भाडे व हमाली ४० रुपये, बाजार समिती हमाली तोलाई प्रति गोणी १० रुपये असा किमान खर्च आहे. चालू वर्षी वातावरणातील बदलामुळे सरासरी एकरी उत्पादन १०० क्विंटलपर्यंत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील कांदा खरेदी करणाºयांची संख्या कमी झाली आहे. तर स्थानिक व्यापारी अत्यंत कमी भावात खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने लागवड खर्चही वसूल होत नाही. हताश झालेल्या श्यामराव कुटे यांनी एका एकरातील कांदा नदीपात्रात फेकून दिला. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवनी येथील शेतकरी शामराव कुटे, पंजाब ठाकरे, विठ्ठल ठाकरे, केशव भेंडेकर, जयाजी भेंडेकर यांनी केली आहे.